‘राखणेच्या’ मानाच्या ताटावरून झालेल्या मारहाणीत जखमी वृद्धाचा मृत्यू

चिपळूण:

चिपळूण शहरातील ओझरवाडी भागात एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. ओझरवाडी येथील शंकर मंदिरासमोर ‘राखणेच्या’ मानाच्या ताटावरून झालेल्या वादातून चौघांनी केलेल्या जबर मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ७३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. यशवंत कृष्णा फके (वय ७३ वर्ष) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण चिपळूण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मानाच्या ताटावरून झाला होता वाद

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ओझरवाडी शंकर मंदिरासमोर घडली होती. मंदिरातील धार्मिक कार्यक्रमादरम्यान ‘राखणेच्या’ मानाच्या ताटावरून यशवंत फके आणि इतर काही जणांमध्ये तीव्र वादविवाद झाला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले आणि चौघांनी मिळून फके यांना बेदम मारहाण केली.

या भीषण मारहाणीत यशवंत फके हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात आवश्यक ते उपचार करण्यात आले होते आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घरीच विश्रांती घेत होते.


शुक्रवारी पहाटे अचानक प्रकृती बिघडली

उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा होत असतानाच, शुक्रवारी सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास यशवंत फके यांना अचानक अत्यंत अस्वस्थ वाटू लागले. कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

नातेवाईक आक्रमक; मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

यशवंत फके यांच्या अचानक झालेल्या निधनाची बातमी समजताच त्यांचे नातेवाईक आणि ओझरवाडीतील संतप्त नागरिक कामथे रुग्णालयात एकत्र जमले. मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी सुरुवातीला मृतदेह ताब्यात घेण्यास तीव्र नकार दिला. यामुळे रुग्णालयाबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तथापि, पोलीस आणि प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर अखेर हे प्रकरण शांत झाले. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि दुपारी रामतीर्थ स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 18-05-2026