Ratnagiri: चालताना ‘रील्स’ पाहताना मोबाईलचा स्फोट; रत्नागिरीतील तरुण जखमी

रत्नागिरी:

मोबाईलचा वापर करताना काळजी घेणे किती गरजेचे आहे, हे दाखवणारी एक धक्कादायक घटना रत्नागिरीत समोर आली आहे. रात्रीच्या वेळी घरी चालत जात असताना मोबाईलवर सोशल मीडियावरील ‘फेसबुक रील्स’ पाहत असताना अचानक मोबाईलचा भीषण स्फोट झाला. या अपघातात एक तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुशिल सुनिल रहाटे (वय ३५ वर्षे, रा. कोळंबे, रत्नागिरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवार, १५ मे २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास फिनोलेक्स फाटा ते कोळंबे गावच्या दरम्यान रस्त्यावर घडली.

गॅरेज बंद करून घरी परतताना घडली घटना

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशिल रहाटे यांचे फिनोलेक्स फाटा येथे स्वतःचे गॅरेज आहे. रोजच्याप्रमाणे गॅरेजमधील काम आटोपून रात्री साडेदहाच्या सुमारास ते चालत आपल्या कोळंबे गावातील घरी जात होते. रस्ता चालत असताना त्यांनी मोबाईलवर फेसबुक रील्स पाहण्यास सुरुवात केली.

रील्स पाहत असतानाच अचानक त्यांच्या हातातील मोबाईलचा मोठा आवाज होऊन स्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे हातातील मोबाईल लगेच खाली पडला, मात्र या दुर्घटनेत सुशिल यांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे.


जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

मोबाईलचा स्फोट झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी सुशिल रहाटे यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे चालताना किंवा सतत मोबाईल वापरण्याच्या अतिरेकावर आणि सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 18-05-2026