petrol Diesel Price Hike: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि इंधनाच्या किमतींमधील अनिश्चिततेमुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. गेल्या १० दिवसांतील ही चौथी दरवाढ असून, यामुळे ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.
आज, २५ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून देशभरात इंधनाचे नवे दर लागू झाले आहेत.
या ताज्या दरवाढीत पेट्रोलच्या किमतीत २.६१ रुपये तर डिझेलच्या किमतीत २.७१ रुपये प्रति लीटरची मोठी वाढ करण्यात आली आहे. या नव्या वाढीमुळे देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलने अखेर १०० रुपयांचा टप्पा ओलांडला असून ते १०२.१२ रुपये झाले आहे, तर डिझेल ९५.२० रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे.
एप्रिल २०२२ नंतरची सर्वात मोठी दरवाढ मालिका
गेल्या दोन वर्षांपासून (एप्रिल २०२२ पासून) देशात इंधनाचे दर जवळपास स्थिर होते. केवळ मार्च २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी पेट्रोल-डिझेल २ रुपयांनी स्वस्त करण्यात आले होते. मात्र, १६ मे रोजी अचानक ३ रुपयांची वाढ करून ही स्थिरता संपुष्टात आली. त्यानंतर अवघ्या १० दिवसांत ४ वेळा किमती वाढवून सरकारने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. यापूर्वी २३ मे रोजीही पेट्रोल ८७ पैशांनी तर डिझेल ९१ पैशांनी महागले होते.
देशातील ४ प्रमुख महानगरांतील ‘नवे दर’ (२५ मे पासून लागू):
२५ मे च्या सकाळी ६ वाजल्यापासून देशातील चार प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे आहेत:
१. पेट्रोलचे नवे दर (प्रति लीटर)
मुंबई, पुणे: १११.२१ रुपये (+२.७२ वाढ)
कोलकाता: ११३.५१ रुपये (+२.८७ वाढ)
चेन्नई: १०७.७७ रुपये (+२.४६ वाढ)
दिल्ली: १०२.१२ रुपये (+२.६१ वाढ)
२. डिझेलचे नवे दर (प्रति लीटर)
कोलकाता: ९९.८२ रुपये (+२.८० वाढ)
चेन्नई: ९९.५५ रुपये (+२.५७ वाढ)
मुंबई, पुणे: ९७.८३ रुपये (+२.८१ वाढ)
दिल्ली: ९५.२० रुपये (+२.७१ वाढ)
सीएनजी (CNG) धारकांनाही मोठा फटका
केवळ पेट्रोल-डिझेलच नाही, तर वाहन चालक आणि रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सीएनजीच्या (CNG) दरातही २३ मे रोजी १ रुपया प्रति किलोची वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांतील ही तिसरी वाढ असून, आतापर्यंत सीएनजी एकूण ४ रुपयांनी महागला आहे.
मालवाहतूक महागणार, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार!
इंधनाच्या दरात सातत्याने होणाऱ्या या वाढीमुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिक, ट्रान्सपोर्ट ऑपरेटर (मालवाहतूकदार) आणि सर्वसामान्य वाहनधारकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. डिझेल महागल्यामुळे येत्या काही दिवसांत भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक महाग होऊन बाजारात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 25-05-2026














