गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्याबाबत कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, केंद्र सरकारची माहिती

नवी दिल्ली : गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याबाबत सध्या कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही, असे केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शनिवारी स्पष्ट केले.

विविध संघटना आणि गटांकडून अशा मागण्या सातत्याने होत असल्या तरी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पातळीवर यासंदर्भात कोणतीही प्रक्रिया सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले.

वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मेघवाल यांनी सांगितले की, गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्याची तसेच देशव्यापी गोहत्याबंदी लागू करण्याची मागणी वेळोवेळी विविध संघटना तसेच खासदारांकडून केली जाते. नागरिकही अर्ज आणि निवेदने देऊन अशा उपाययोजना करण्याची मागणी करतात. मात्र, सध्या तरी असा कोणताही प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मेघवाल म्हणाले.

राज्यनिहाय वेगवेगळे कायदे
राज्यनिहाय स्थिती पाहता गोहत्येसंदर्भात त्या-त्या राज्यांत कायदे भिन्न आहेत. स्थानिक परिस्थिती आणि गरजांनुसार राज्य सरकारे निर्णय घेतात, असे मेघवाल म्हणाले.

अलीकडेच पश्चिम बंगालमधील सरकारने राज्याच्या १९५०च्या कायद्यानुसार जनावरांच्या कत्तलीवरील नियमांची अंमलबजावणी अधिक कडक करण्यासाठी पावले उचलल्याचा संदर्भही त्यांनी दिला.

अनेक संघटनांकडून समर्थन
अनेक हिंदू संघटना सातत्याने गोहत्याबंदीची मागणी करीत आहेत. त्याचबरोबर इतर समुदायातील काही संघटना आणि धर्मगुरूंनीही गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यास आणि देशव्यापी गोहत्याबंदी लागू करण्यास पाठिंबा दर्शवलेला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:22 01-06-2026