एस.टी. स्टँडसमोरून अक्टीवा दुचाकी लंपास; चावी गाडीतच राहिल्याचा चोरट्यांनी साधला फायदा

रत्नागिरी, दि. २ जून २०२६ : रत्नागिरी शहरातील एस.टी. स्टँड परिसरात भरदिवसा दुचाकी चोरीची घटना घडल्याने वाहनधारकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. एस.टी. स्टँडच्या मधील गेटसमोर उभी केलेली अॅक्टिवा दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याकुब सलोमन खिश्चन (वय ३३ वर्षे) हे खाजगी नोकरी करतात. ते सध्या खेडशी येथील महालक्ष्मी मंदिराजवळील पुष्पेंद्र सिटी क्लासिक रेसिडेन्सी येथे भाड्याने राहतात. दिनांक १ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांची पांढऱ्या रंगाची अॅक्टिवा दुचाकी (क्रमांक MH 50 B 3231) एस.टी. स्टँडच्या मधील गेटसमोर उभी करून ठेवली होती.

चावी गाडीतच असल्याचा चोरट्यांनी घेतला फायदा

फिर्यादी यांनी दुचाकी पार्क करताना चावी गाडीतच लावून ठेवली होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात इसमाने संबंधित दुचाकी मालकाच्या परवानगीशिवाय चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

१० हजार रुपयांच्या दुचाकीची चोरी

या चोरीत सुमारे १० हजार रुपये किमतीची अॅक्टिवा दुचाकी चोरीस गेली आहे. वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १७५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

वाहनधारकांनी दुचाकी किंवा चारचाकी वाहन पार्क करताना चावी वाहनात ठेवू नये, तसेच गर्दीच्या ठिकाणी वाहन सुरक्षितरीत्या लॉक करूनच सोडावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.