विद्यार्थ्यांच्या अडचणींनंतर सीबीएसईचा निर्णय; ‘एक्स’वर पोस्ट करत दिली माहिती
नवी दिल्ली: ‘CBSE 12th Verification Deadline’ म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता १२ वीच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी (Verification) आणि पुनर्मूल्यांकनासाठी (Revaluation) अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत एक दिवसाने वाढवून ७ जून केली आहे. नवी दिल्ली येथून ‘पुढारी वृत्तसेवा’ने दिलेल्या वृत्तानुसार, सीबीएसईच्या अधिकृत पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारींनंतर बोर्डाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
उत्तरपत्रिका पाहणे, गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची ही प्रक्रिया २ जून रोजी सीबीएसईच्या पोर्टलवर सुरू करण्यात आली होती. मात्र, या पोर्टलवर प्रक्रिया पूर्ण करताना आणि अर्ज सादर करताना अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांची हीच समस्या आणि गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि त्यांच्या भविष्याचा सकारात्मक विचार करून, सीबीएसईने इयत्ता १२ वीच्या बोर्ड परीक्षांसाठी पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाचे अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे आधी अर्ज करता आले नव्हते, त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता अतिरिक्त वेळ आणि मदत मिळेल, असे मंडळाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:05 08-06-2026














