मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या निर्देशानुसार विशेष पथकाची धाड; १०.३० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
देवरुख: पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी आणि वसुंधरेच्या रक्षणासाठी देवरुख नगरपंचायतीने रविवारी येथील स्थानिक आठवडा बाजारामध्ये प्लास्टिक बंदीची धडक मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर व विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली. नगरपंचायतीच्या या धडक कारवाईमुळे आठवडा बाजारात प्लास्टिकचा सर्रास वापर करणाऱ्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जनजागृतीनंतरही अनास्था; अखेर नगर प्रशासनाने उचलले कडक पाऊल
देवरुख शहरात आणि आठवडा बाजारात यापूर्वी नगरपंचायतीच्या वतीने वेळोवेळी प्लास्टिक बंदीबाबत व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती. नागरिकांना तसेच स्थानिक व्यापाऱ्यांना ‘सिंगल युज’ (एकदाच वापरण्यायोग्य) प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगून त्याचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाच्या या आवाहनानंतरही कित्येक व्यापारी सर्रासपणे सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असल्याचे नगरपंचायतीच्या निदर्शनास आले. या अनास्थेला चाप लावण्यासाठी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी थेट प्लास्टिक बंदी मोहीम राबवण्याचे कडक निर्देश दिले.
विशेष पथकाची बाजारात धाड; १०.३० किलो प्लास्टिक जप्त
मुख्याधिकार्यांच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाने रविवारी थेट आठवडा बाजारात धाड टाकली. या विशेष पथकामध्ये स्वच्छता निरीक्षक आरिफ शेख, लिपिक सागर रेवणे, निखिल शिंदे, प्रतीक बारगुडे आणि स्वच्छता कर्मचारी सुभाष कदम व आग्रे यांचा समावेश होता. या पथकाने बाजारातील व्यापाऱ्यांची कसून तपासणी केली आणि बंदी असलेल्या सुमारे १०.३० किलो ग्रॅम प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यापाऱ्यांकडून एकूण २ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.
नागरिकांना कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन; कायदेशीर कारवाईचा इशारा
या धडक कारवाईनंतर मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी शहरातील सर्व नागरिक आणि व्यापाऱ्यांना जाहीर आवाहन केले आहे. पर्यावरणाचे आणि आपल्या वसुंधरेचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असून आपली एक छोटीशी जागरूकता भविष्यातील पिढ्यांना उत्तम आरोग्य देणार आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सर्वांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णतः टाळावा आणि बाजारात येताना कापडी पिशव्यांचाच वापर करावा, अशी सूचना प्रशासनाने केली आहे. यापुढेही शहरात अशा प्रकारची मोहीम सुरूच राहणार असून, प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा मुख्याधिकार्यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:49 16-06-2026














