जातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्रासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन
रत्नागिरी:
कोळी महासंघाचे धरणे आंदोलन मंगळवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अत्यंत आक्रमकपणे पार पडले. महाराष्ट्र राज्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी व डोंगर कोळी या आदिवासी कोळी जमातीतील बांधवांना त्यांचे जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे, या मुख्य मागणीसाठी हे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. आगामी पावसाळी अधिवेशनात या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा न निघाल्यास संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
सहाज्याद्री अतिथीगृहावरील बैठकीच्या निर्णयांना शासनाकडून दिरंगाई
आदिवासी कोळी समाज बांधवांना जातीचे दाखले, जात वैधता प्रमाणपत्र व रक्त नात्यातील नातेवाईकांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळवून देण्यासाठी २० ऑक्टोबर २०२३ रोजी सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक मंत्री, खासदार, आमदार, अतिरिक्त मुख्य सचिव, विविध विभागांचे सचिव, प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि आदिवासी कोळी समाजाचे शिष्टमंडळ उपस्थित होते. या उच्चस्तरीय बैठकीत कोळी समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या बैठकीला जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही शासनाकडून या निर्णयांची किंवा इतिवृत्ताची अंमलबजावणी करण्यास कमालीची दिरंगाई होत आहे.
शासनाच्या टाळाटाळीमुळे समाज बांधवांमध्ये तीव्र संताप
शासनाकडून कोळी समाजाच्या हक्कांचे परिपत्रक काढण्यास सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याने आदिवासी कोळी समाज बांधवांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली या न्याय्य हक्कांच्या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन करून निवेदन देण्याचा कार्यक्रम कोळी महासंघातर्फे राबवण्यात आला.
माजी आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची हाक
आगामी पावसाळी अधिवेशनात आदिवासी कोळी समाजाचा हा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी न लावल्यास, संपूर्ण महाराष्ट्रभर माजी आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी महासंघ अधिक तीव्र आणि व्यापक स्वरूपाचे आंदोलन सुरू करेल, असा स्पष्ट इशारा कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष डॉ. चेतन पाटील यांनी दिला आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील या आंदोलनप्रसंगी कोळी महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पांडुरंग बाळ्या पोक्षे, जिल्हा संपर्क प्रमुख पंढरीनाथ का. चौगुले, अनिल पोटफोडे, बाबा साळवी यांच्यासह आदिवासी कोळी समाजातील प्रमुख पदाधिकारी, महिला प्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:01 17-06-2026














