Ambergris Smuggling Case: रत्नागिरीत कस्टम्सची मोठी कारवाई; साडेदहा किलोची व्हेल माशाच्या उलटीसह दोघांना अटक

◼️ आरोपींना ३० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी (खेड): Ambergris Smuggling Case म्हणजेच व्हेल माशाच्या उलट्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा दापोली कस्टम्स विभागाने पर्दाफाश केला आहे. खेड रेल्वे स्थानकाजवळ १६ जून रोजी पहाटेच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात अधिकाऱ्यांनी साडेदहा किलोहून अधिक वजनाचे मौल्यवान ‘अंबरग्रिस’ जप्त केले असून, याप्रकरणी दोन संशयित तस्करांना अटक करण्यात आली आहे. ‘द वाईल्ड लाईफ (प्रोटेक्शन) ॲक्ट १९७२’ चे सर्रास उल्लंघन करून या प्रतिबंधित पदार्थाची अवैध वाहतूक व विक्री केली जात असताना कस्टम्सने ही धडक कारवाई केली.

गुप्त माहितीच्या आधारे खेड रेल्वे स्थानकाजवळ सापळा

काही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिबंधित असलेल्या वन्यजीव सामग्रीची रत्नागिरी जिल्ह्यातून वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती दापोली कस्टम्स विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कस्टम्सच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावरील खेड रेल्वे स्थानक परिसरात १५ आणि १६ जूनच्या मध्यरात्रीपासूनच कडक पाळत ठेवून सापळा रचला होता. पहाटेच्या सुमारास संशयास्पद हालचाली दिसताच अधिकाऱ्यांनी एका ‘रेनो क्विड’ कारला अडवून तिची कसून तपासणी केली असता, त्यात साडेदहा किलोहून अधिक वजनाचा अंबरग्रिसचा साठा हस्तगत करण्यात आला.

३० जून २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी; मुद्देमाल वन विभागाकडे

जप्त करण्यात आलेला अंबरग्रिस हा अमूल्य पदार्थ ‘वाईल्ड लाईफ (प्रोटेक्शन) ॲक्ट १९७२’ नुसार अनुसूची १ (स्पर्म व्हेल) अंतर्गत पूर्णपणे प्रतिबंधित आहे. त्यामुळे कस्टम्स अधिकाऱ्यांनी तात्काळ हा मुद्देमाल जप्त करून कारमधील दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींना खेड येथील माननीय न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३० जून २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच, जप्त केलेले अंबरग्रिस पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

तस्करांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस; कस्टम्सचे आवाहन

रत्नागिरीच्या विस्तीर्ण किनारपट्टीचा आणि महामार्गांचा वापर करून होणाऱ्या तस्करीसारख्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून पुढे यावे, असे आवाहन कस्टम्स विभागाने केले आहे. वन्यजीव किंवा इतर कोणत्याही वस्तूंच्या तस्करीची अचूक माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल आणि शासकीय नियमानुसार त्यांना योग्य ते आर्थिक बक्षीस देखील दिले जाईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांसाठी संपर्क आवाहन: रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी किनारपट्टी किंवा महामार्ग परिसरातील कोणत्याही संशयास्पद हालचाली अथवा तस्करीबाबत माहिती असल्यास नागरिक ८४२११८८७५० या क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा थेट फोनद्वारे संपर्क साधून कस्टम्स विभागाला माहिती देऊ शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 18-06-2026