विद्यार्थ्यांना कौशल्यधारित शिक्षणाची संधी; ११ वी प्रवेशासाठी ऑफलाइन प्रक्रिया सुरू
रत्नागिरी: Ratnagiri Vocational Courses च्या क्षेत्रात गेल्या ३० वर्षांपासून अग्रेसर असलेल्या येथील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक शाखांबरोबरच कौशल्यधारित आणि व्यवसायाभिमुख शिक्षणाचा उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. महाविद्यालयात गेल्या ३० वर्षांपासून व्होकेशनल (MCVC) अभ्यासक्रम यशस्वीरीत्या राबवले जात असून, या अभ्यासक्रमाने सलग १५ वर्षे १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी ११ वी प्रवेशाची ऑफलाइन प्रक्रिया आता सुरू झाली आहे.
विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी ऑफलाइन प्रक्रिया राबवली जात असून महाविद्यालय स्तरावरच गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्याची अधिक संधी उपलब्ध होते. महाविद्यालयात सध्या खालील महत्त्वाचे कोर्सेस उपलब्ध आहेत:
- Accounting and Office Management (AOM)
- Logistic and Supply Chain Management (LSM)
- Medical Laboratory Technology (MLT)
- Electronics Technology (ET)
७० टक्के प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि वैशिष्ट्ये या व्होकेशनल अभ्यासक्रमांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांना ७० टक्के प्रात्यक्षिक (Practical) प्रशिक्षण दिले जाते. अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना लेखांकन, लॉजिस्टिक्स, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर आणि नेटवर्किंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये थेट प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाते. याशिवाय ऑन जॉब ट्रेनिंग, औद्योगिक भेटी (Industrial Visits), तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शासकीय अप्रेंटिसशिप योजना तसेच शासकीय फी सवलतींचा लाभ विद्यार्थ्यांना मिळतो.
पुढील शिक्षणासाठी इन-हाऊस प्रवेशाची सुविधा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘इन-हाऊस’ प्रवेशाची विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजच्या अत्यंत स्पर्धात्मक युगात केवळ पदवी नव्हे, तर कौशल्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढवणाऱ्या या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 20-06-2026














