Chiplun News: राज्य सरकारच्या ‘एसआयआर’ धोरणाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक; ७ ऑक्टोबरला चिपळूणमध्ये मोर्चाचा एल्गार

आमदार भास्कर जाधव यांचे ‘झेन-जी’ तरुणाईला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याचीही करणार मागणी

कोकणातील चिपळूण शहरातून एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. राज्य सरकारच्या ‘एसआयआर’ (SIR) धोरणाविरोधात आता महाविकास आघाडीने थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. या धोरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे येत्या ७ ऑक्टोबर रोजी चिपळूणमध्ये भाजप सरकारच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारी व नियोजनासाठी चिपळूण येथे शिवसेना (उबाठा) आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः आमदार भास्कर जाधव करणार असून, त्यांनी या लढ्यात सहभागी होण्यासाठी ‘Gen-Z’ म्हणजेच नव्या पिढीतील तरुणाईला रस्त्यावर उतरण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

‘झेन-जी’ तरुणाईला भास्कर जाधवांचे साद; आंदोलनाची रूपरेषा

महाविकास आघाडीचा हा मोर्चा बहादूर शेख नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू होईल. तसेच इंदिरा गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून या मोर्चाची पुढील वाटचाल होणार आहे. उत्तर रत्नागिरीतील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण आणि गुहागर येथील तरुणांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले. दिल्लीच्या जंतर-मंतरवर ज्याप्रमाणे ‘झेन-जी’ तरुणांनी लोकशाही रक्षणासाठी आंदोलन केले, तसेच ज्यांचा लोकशाही व संविधानावर विश्वास आहे अशा सर्वांनी या मोर्च्यात उतरावे. “आम्ही तरुण संविधान आणि लोकशाहीचा खून होऊ देणार नाही,” असा एल्गार त्यांनी पुकारला.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

पत्रकार परिषदेत बोलताना भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले की, हा मोर्चा केवळ ‘एसआयआर’ धोरणापुरता मर्यादित नसून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी देखील असेल. मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली असून ते भारतीय जनता पक्षासाठी काम करत असल्याचा थेट आरोप जाधव यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निवृत्त झाल्यावर सत्ताधाऱ्यांकडून राजकीय पदे आणि खासदारकी घेत आहेत, असे ताशेरेही त्यांनी ओढले.

Kore Mobile

मतदार याद्या आणि बांगलादेशी मुद्द्यावरून भाजपवर घणाघात

देशातील मतदार याद्यांवरून गंभीर आरोप करताना भास्कर जाधव म्हणाले की, “२०२४ मध्ये आपल्या देशातील तब्बल २ कोटी ६ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात आली आहेत.” तसेच भाजपच्या १२ वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी किती बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशी घुसवल्याचा दावा करत भाजप दरवेळी बांगलादेशी मुद्द्यावर केवळ राजकारण घडवून आणत असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 03-10-2026