रत्नागिरी उपकेंद्रात सामूहिक योगाभ्यासाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र येथे १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या Yoga for Healthy Ageing’ (निरोगी वृद्धत्वासाठी योग) या संकल्पनेनुसार विशेष सामूहिक योग सत्राचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांची उपस्थिती लाभली. उपकेंद्रातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामूहिक योगाभ्यास केला.

यावेळी उपकेंद्रातील प्रा. अविनाश चव्हाण तसेच एम.ए. योगशास्त्रची विद्यार्थीनी सौ. प्रिया चव्हाण यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना योग्य पद्धतीने योगाभ्यासाचे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. योग हा शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक शांततेचा अद्वितीय संगम असून, नियमित योगाभ्यासामुळे अनेक शारीरिक व मानसिक समस्यांवर मात करता येते, असे त्यांनी सांगितले.

तसेच, Yoga for Healthy Ageing या संकल्पनेचा स्वीकार करून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात नियमित योगाभ्यासाचा समावेश करावा, जेणेकरून भविष्यात निरोगी, सक्रिय आणि सुदृढ जीवन जगता येईल, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

या योग दिन कार्यक्रमामुळे उपकेंद्रात आरोग्य, शिस्त आणि सकारात्मकतेचा संदेश देत योगाबाबत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपकेंद्रातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 22-06-2026