NEET Exam Ratnagiri: रत्नागिरीतील दोन केंद्रांवर ‘नीट’ची परीक्षा शांततेत; १५१ विद्यार्थी गैरहजर

पेपर फुटीनंतर रविवारी पुन्हा घेण्यात आली नीट परीक्षा; चोख पोलीस बंदोबस्तात ८८८ विद्यार्थ्यांनी दिले पेपर

NEET Exam Ratnagiri | वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारी ‘नीट’ (NEET) प्रवेश परीक्षा रविवारी रत्नागिरी शहरातील दोन मुख्य केंद्रांवर कडक सुरक्षेत आणि शांततेत पार पडली. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण १ हजार ३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८८८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष केंद्रावर उपस्थित राहून परीक्षा दिली, तर १५१ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर राहिले असल्याचे समोर आले आहे.

यापूर्वी ही नीट परीक्षा ३ मे रोजी आयोजित करण्यात आली होती; मात्र पेपर फुटीच्या प्रकरणामुळे ती परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून ही परीक्षा रविवारी पुन्हा घेण्यात आली. रत्नागिरी शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि फाटक हायस्कूल या दोन निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत ही परीक्षा प्रक्रिया राबवण्यात आली.

विद्यार्थ्यांना १५ मिनिटांची अतिरिक्त वेळ

या वेळच्या परीक्षेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी १५ मिनिटांची अधिकची वेळ वाढवून देण्यात आली होती. मागच्या वेळी झालेल्या परीक्षेचा एकूण कालावधी तीन तासांचा होता; मात्र यावेळी ५.१५ वाजेपर्यंत वेळ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला. तरीही, पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुन्हा एकदा होत असल्याने परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात चिंतेचे वातावरण आणि मानसिक दडपण स्पष्टपणे जाणवत होते.

Shiva optical

कडक बंदोबस्त आणि पालकांची गर्दी

परीक्षा पुन्हा होत असल्याने जिल्हा प्रशासनाने केंद्रांवर चोख व्यवस्था ठेवली होती. रविवार सकाळपासूनच दोन्ही परीक्षा केंद्रांच्या बाहेर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. सुरक्षेचा उपाय म्हणून दोन्ही केंद्रांवर स्थानिक पोलीस प्रशासनासह ‘सीआरपीएफ’चे (CRPF) जवान तैनात करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची सखोल तपासणी करूनच त्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला. अखेर सर्व यंत्रणांच्या चोख बंदोबस्तात ही परीक्षा कोणत्याही अडथळ्याविना शांततेत संपन्न झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 22-06-2026