नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक आक्रमक; ठरावांवर कार्यवाही होत नसल्याने प्रशासनावर तीव्र ताशेरे
रत्नागिरी : अल निनोचा वाढता प्रभाव आणि भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेता रत्नागिरी शहरात पाणी कपात करणे अटळ झाले आहे. या पार्श्वभूमीवर दर सोमवारी शहरात पाणी कपात करावी का, याबाबत पालिका प्रशासनाकडून गांभीर्याने विचार सुरू आहे. नगरपालिकेच्या बुधवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत पाणी कपातीबाबत एकमत झाले नसले तरी यावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय अनधिकृत नळ जोडण्या तोडणे आणि वॉशिंग रॅम्पला पालिकेचे पाणी बंद करण्याबाबत सभेत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
दर सोमवारी कपात की रोज १० मिनिटे? नगरसेवकांमध्ये मतप्रवाह
सभेत पाणी सभापती निमेश नायर यांनी स्पष्ट केले की, अल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पाऊस झाला असून भविष्यातील पाण्याची उपलब्धता अनिश्चित आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचे नियोजन करण्यासाठी दर सोमवारी पाणी कपात करावी. यावर उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी रोजच्या पाणी पुरवठ्याच्या वेळेतून १० मिनिटांची कपात करण्याचा पर्याय सुचवला, ज्यामुळे नागरिकांना त्रास न होता पाण्याची बचत होईल. या विषयावर अंतिम निर्णय काही दिवसांनी घेण्याचे ठरले असून नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच व्यावसायिक वॉशिंग रॅम्प आणि अनधिकृत नळ जोडण्या तत्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली.

प्रशासनाच्या मंद कारभारावर नगरसेवक संतप्त
सभागृहात मंजूर झालेल्या ठरावांवर प्रशासनाकडून वेळेत कार्यवाही होत नसल्याने सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. "तेच तेच विषय परत येत असतील तर सभा कशाला घ्यायच्या?" असा सवाल करत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. भाजपच्या नगरसेविका वर्षा ढेकणे यांनी रामआळीतील मातीचा ढिगारा काढण्याच्या जुन्या ठरावावर कारवाई न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली, तर नगरसेवक राजू तोडणकर यांनी फडके उद्यानाचे काम वर्षानुवर्षे रखडल्याबद्दल जाब विचारला. यावर मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सर्व ठरावांची गांभीर्याने अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन दिले.
अतिक्रमण कारवाई आणि खड्ड्यांबाबत महत्त्वाचे ठराव
नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आणि मुख्याधिकारी वैभव गारवे उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला गणेशोत्सवानंतर मांडवी समुद्रकिनारी किनाऱ्यावर आलेल्या गणेशमूर्तींचे नगरसेवक बंटी कीर व स्थानिक तरुणांच्या मदतीने पुनर्विसर्जन केल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले. या सभेत शहरातील अतिक्रमणांवर पुन्हा धडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व प्रभागांतील खड्डे पूर्णपणे बुजवेपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये, असा महत्त्वपूर्ण ठरावही सर्वसंमतीने संमत करण्यात आला.













