१ ऑक्टोबरच्या सक्तीच्या पार्श्वभूमीवर एसटी स्थानकात नागरिकांच्या रांगा; सर्व्हर डाऊन आणि संथ कारभारामुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल
रत्नागिरी : रत्नागिरी येथील एसटीच्या मध्यवर्ती बसस्थानकातील केंद्रावर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) स्मार्ट कार्ड नोंदणी आणि प्रत्यक्ष कार्ड वितरण प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाला आहे. एसटी प्रशासनाचा कमालीचा संथ कारभार, वारंवार डाऊन होणारा सर्व्हर आणि तासनतास रांगेत ताटकळत उभे राहणाऱ्या नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी व्यवस्था यामुळे सामान्य प्रवाशांसह विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. उद्या, १ ऑक्टोबरपासून हे कार्ड वापरणे सक्तीचे करण्यात आल्याने ३० सप्टेंबर रोजी केंद्रावर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती, मात्र प्रशासनाकडून कोणतीही योग्य व्यवस्था करण्यात आली नाही.
महिनाभर चकरा मारूनही कार्ड मिळेना; नागरिकांचा संताप
नोंदणी करून महिना उलटला तरी कार्ड हातात न पडल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. स्थानिक रहिवासी उज्ज्वला विपुल गुप्ते यांनी व्यवस्थेच्या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, कार्डसाठी नोंदणी करून महिना लोटला आहे; शनिवारी कार्ड घेण्यासाठी बोलावल्यानंतर त्या केंद्रावर गेल्या, मात्र त्यानंतर शुक्रवारी व १४ तारखेला अशा लागोपाठ चकरा मारूनही ‘कार्ड ॲक्टिव्हेट होत नाही’ असे सांगून त्यांना माघारी पाठवण्यात आले. मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून त्या पुन्हा केंद्रावर ताटकळत थांबल्या, तरी दुपारी दीड वाजेपर्यंत त्यांचा नंबर आलाच नाही. त्यातच संबंधित कर्मचारी जेवणाच्या सुट्टीसाठी निघून गेल्यामुळे रांगेतील नागरिकांना केवळ हताशपणे वाट पाहत राहावे लागले.

पहाटे ६ वाजेपासून रांगा; अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी
मानसी वैद्य या दुसऱ्या एका महिलेने आपली कैफियत मांडताना सांगितले की, त्या कार्ड काढण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून सतत चकरा मारत आहेत. पंधरा-वीस दिवसांपूर्वी आल्या असताना सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून त्यांना परत पाठवण्यात आले होते. सध्या अनेक नागरिक कार्ड मिळवण्यासाठी पहाटे ६ वाजल्यापासून रांगेत उभे राहत आहेत. गर्दीच्या वेळेत अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून ही प्रक्रिया जलद गतीने मार्गी लावावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
प्रशासनाने तातडीने तांत्रिक त्रुटी दूर करण्याची मागणी
वयस्क आणि ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक त्रास सहन करत तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांचे अतोनात हाल होत आहेत. या अनागोंदीमुळे जनतेचा अत्यंत मौल्यवान वेळ वाया जात असून, वरिष्ठ एसटी प्रशासनाने तातडीने या तांत्रिक त्रुटी दूर करून योग्य सोयी-सुविधा पुरवाव्यात आणि ही संपूर्ण प्रक्रिया जलद व सुलभ करावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.













