India Rain IMD News: ‘मान्सून’चा परतीचा प्रवास सुरु..

India Rain IMD News: 'मान्सून'चा परतीचा प्रवास सुरु..

रब्बी पेरणीवर भीषण संकट

नवी दिल्ली / मुंबई:

India Rain IMD News बाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केलेल्या अधिकृत अहवालानुसार, यावर्षी देशभरात सरासरीपेक्षा १३ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. २०२६ च्या मान्सून हंगामात जून ते सप्टेंबरदरम्यान देशभरात ८७ टक्के म्हणजेच एकूण ७५९.४ मिमी पाऊस झाला आहे. ही आकडेवारी सन २००१ नंतरचा चौथा, तर १९०१ नंतरचा १३ वा सर्वात कमी पाऊस ठरली आहे.

प्रादेशिक तूट आणि ईशान्य भारतात ऐतिहासिक नीचांक

Amey jwelrs

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य भारतात १९०१ नंतरचा सर्वात कमी पाऊस नोंदवला गेला आहे, तर दक्षिण द्वीपकल्पात १९०१ नंतरचा हा चौथा सर्वात कमी पाऊस ठरला आहे. मध्य भारतात मात्र सामान्य पावसाची नोंद झाली आहे. देशातील एकूण ३६ हवामान विभागांपैकी १७ विभागांमध्ये पावसाची मोठी तूट भासली आहे. १८ हवामान विभागांमध्ये सामान्य पाऊस झाला असून एकट्या ओडिशात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मान्सून कोअर झोनमध्ये ७७९.९ मिमी पाऊस झाला असून तो सामान्य पावसाच्या किमान मर्यादेपेक्षाही कमी आहे.

महिनानिहाय पावसाची टक्केवारी आणि मान्सूनचा प्रवास

हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात ६५ टक्के, जुलैमध्ये १०१ टक्के, ऑगस्टमध्ये ८४ टक्के, तर सप्टेंबर महिन्यात ९२ टक्के पाऊस झाला. यंदा १६ मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये मान्सूनचे आगमन झाले होते, तर ४ जून रोजी त्याने केरळमध्ये प्रवेश केला. ९ जुलैपर्यंत मान्सूनने संपूर्ण देश व्यापला होता. त्यानंतर १९ सप्टेंबरपासून राजस्थानमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

महाराष्ट्रात एका दशकातील सर्वात कमी पाऊस; १८ टक्के तूट

महाराष्ट्रात यंदा पावसाने अत्यंत निराशाजनक चित्र निर्माण केले आहे. राज्यात एका दशकानंतर सर्वात कमी पावसाची नोंद झाली असून सरासरी तूट १८ टक्क्यांवर पोहोचली आहे. पावसाचे चारही महिने बहुतांश भागात कोरडेच गेले असून दीड महिना तर अनेक भागांत पावसाचा एक थेंबही पडला नाही. जिथे पाऊस झाला तोही अपुरा पडल्याने संपूर्ण राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे रब्बीच्या पेरण्यांवर मोठे संकट ओढावले असून बळीराजा कमालीचा अडचणीत सापडला आहे.

शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सल्ल्यानेच पेरणी करण्याचे आवाहन

येत्या ५ ते ६ दिवसांत राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी घाईगडबड न करता कृषी विभागाचा अधिकृत सल्ला घेऊनच रब्बी हंगामातील पेरण्यांबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.