जंतर-मंतर परिसरात दगड भरलेला डम्पर आणि फुटलेली कार आढळल्याने वाद; कॉकरोच जनता पार्टीचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप
Jantar Mantar Protest संदर्भात एक मोठी घडामोडी समोर येत असून, कॉकरोच जनता पार्टीकडून (CJP) आज (२० जुलै) संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, सुरक्षेचे कारण देत दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला अधिकृत परवानगी नाकारली आहे. पोलिसांच्या मज्जाव आणि परवानगी नाकारल्यानंतरही जंतर-मंतरवर सुमारे १० हजारांहून अधिक आंदोलक जमा झाले असून परिस्थिती संवेदनशील बनली आहे.
सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी मोर्चाबाबत स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, “आमच्या बाजूने कोणीही कायदेशीर किंवा शांततेचा भंग करणारे कृत्य करणार नाही. संसदेकडे जाणारा हा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण मार्गानेच काढला जाईल, जेणेकरून आंदोलनाला कोणतेही गालबोट लागणार नाही.”
दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार; पोलिसांवर कटाचा आरोप
दरम्यान, आंदोलन सुरू असलेल्या जंतर-मंतर परिसरात अचानक ५-६ दगडांनी भरलेला डम्पर आणि काचा फुटलेली एक नादुरुस्त कार आढळून आल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला. कॉकरोच जनता पार्टीने हा प्रकार म्हणजे दिल्ली पोलिसांचा कट असल्याचा थेट आरोप केला आहे. अभिजित दीपके यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्विट करत पोलिसांच्या प्रशासकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
ट्विटमध्ये दीपके म्हणाले की, “जंतर-मंतरवर आधीच दगडांनी भरलेले ट्रक उभे करण्यात आले आहेत. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या CJP कार्यकर्त्यांवर दगडफेक घडवून आणण्याचा आणि आंदोलनाला बदनाम करण्याचा हा कट आहे का? आंदोलकांनीच गाडीची तोडफोड केली, अशा बातम्या माध्यमांमध्ये चालवण्यासाठी ही सोय करून ठेवण्यात आली आहे.”
सोनम वांगचुक यांचे २३ दिवसांपासून उपोषण; ठेवल्या तीन अटी
या आंदोलनात गेल्या २३ दिवसांपासून उपोषणाला बसलेले प्रसिद्ध समाजसेवक सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेण्यासाठी सरकारसमोर तीन मुख्य अटी ठेवल्या आहेत:
- पहिली अट: शिक्षण व्यवस्था आणि पेपरफुटीच्या प्रकरणांची संपूर्ण जबाबदारी सरकारने स्वीकारावी.
- दुसरी अट: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या शिष्टमंडळाला संसदेत जाण्याची परवानगी द्यावी आणि खासदारांनी संसदेत हा मुद्दा मांडण्याचे स्पष्ट आश्वासन द्यावे.
- तिसरी अट: प्रकृती अस्वास्थ्यामुळे संसदेत जाणे शक्य नसल्यास, खासदारांच्या शिष्टमंडळाने सफदरजंग रुग्णालयात येऊन हे आश्वासन द्यावे.
गेल्या महिनाभरापासून हे आंदोलन सुरू असून, कोणत्याही परिस्थितीत आंदोलनाची शांतता भंग होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार सीजेपीच्या नेतृत्वाकडून करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 20-07-2026














