Ratnagiri: नाचणे मार्गावरून येणाऱ्या एसटी बसेस ‘नाचणे गोडाऊन’ थांब्यावर थांबेनात; विद्यार्थ्यांची मोठी ओढाताण

मागील चार दिवसांपासून शालेय विद्यार्थ्यांचे हाल; बस न थांबल्याने पायपीट आणि तासिका बुडण्याची वेळ

रत्नागिरीत एसटीच्या अनावधानाने किंवा निष्काळजीपणामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असल्याचे समोर आले आहे. शहरातील नाचणे मार्गावरून येणाऱ्या एसटी (सिटी) बसेस मागील चार दिवसांपासून ‘नाचणे गोडाऊन’ येथील अधिकृत थांब्यावर थांबतच नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी ओढाताण होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना दररोज पायपीट करत शाळेत जावे लागत असून, सुमारे एक तास उशिरा पोहोचल्यामुळे त्यांच्या दैनंदिन तासिकाही बुडत आहेत.

विद्यार्थ्यांचे नुकसान अन् एसटी महामंडळाचा अनागोंदी कारभार

शहर व ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी शाळा-कॉलेजमध्ये जाण्यासाठी एसटी तसेच सिटी बसवर पूर्णपणे अवलंबून असतात. एसटी वेळेवर आल्यास विद्यार्थी वेळेत शाळेत पोहोचू शकतात, परंतु सध्या रत्नागिरी विभागात एसटीचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे.

एकीकडे परिवहन मंत्री “जिल्हांतर्गत असो किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या, बसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा,” असे निर्देश देतात. मात्र, रत्नागिरी विभागात या नियमाला हरताळ फाळला जात असल्याचे चित्र आहे. नाचणे मार्गावरून येणारी बस आधीच भरून येत असल्याने चालक-वाहक ‘नाचणे गोडाऊन’ थांब्यावर गाडी न थांबवताच पुढे निघून जातात. त्यामुळे दिलेल्या थांब्यावर बस थांबवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी आता पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांकडून केली जात आहे.

प्रशासकीय आश्वासन:

“शालेय विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील चालक आणि वाहकांना कडक सूचना दिल्या जातील. ठरवून दिलेल्या थांब्यावर बस थांबलीच पाहिजे, विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही.”

आश्वजीत ज्ञानराव, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:03 21-07-2026