‘मिनी महाबळेश्वर’ माचाळमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी; वाहतूक कोंडी व हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष कोम्बिंग ऑपरेशन
लांजा तालुक्यातील ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माचाळ येथे पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. ही गर्दी लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत राहावी, पर्यटकांची सुरक्षितता अबाधित राहावी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आळा बसावा, यासाठी लांजा पोलिसांनी रविवारी विशेष वाहन तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान नियमभंग करणाऱ्या २७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
ट्रॅव्हल्स अपघातानंतर पोलीस सतर्क; रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
शनिवार व रविवारच्या सुट्ट्यांमुळे माचाळ परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत असून रस्त्यावर लहान-मोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी माचाळ मार्गावर एका ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात थोडक्यात टळला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अधिक सतर्क भूमिका घेतली आहे. परिसरातील हुल्लडबाजी, बेदरकार वाहनचालक आणि होणारी वाहतूक कोंडी टळण्यासाठी पोलिसांकडून परिसरात सातत्याने गस्त घातली जात आहे.
पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम
पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान वाहनांची आवश्यक कागदपत्रे, वाहनचालकांचे परवाने (Driving License) तसेच इतर वाहतूक नियमांची कडक तपासणी करण्यात आली. नियमभंग करणाऱ्या २७ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन:
“माचाळ हे निसर्गसौंदर्याने नटलेले लोकप्रिय पर्यटनस्थळ असून पर्यटकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. वाहनाची आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावीत, मद्यपान करून वाहन चालवू नये तसेच वेग मर्यादेचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा.”
— निळकंठ बगळे, पोलीस निरीक्षक, लांजा
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 21-07-2026














