Pandharpur Wari: ‘वारी हा महाराष्ट्राचा पवित्र सांस्कृतिक ठेवा’; वारकऱ्यांच्या सेवेसाठी सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आषाढी पालखी सोहळा निर्मल वारी समारोप समारंभात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन; पंढरपुरात स्वच्छता व उत्तम सुविधा पुरवल्याचा प्रशासनाचा दावा

पंढरपूर वारी ही महाराष्ट्राच्या भक्तिमार्गाची आणि पुरोगामी परंपरेची ओळख असून, कोणत्याही परिस्थितीत हरी नामाचा गजर करणारी ही परंपरा कधीही थांबलेली नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ग्रामविकास विभाग आणि पंचायत राज विभागाच्या वतीने आयोजित ‘आषाढी पालखी सोहळा निर्मल वारी समारोप समारंभात’ ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मोगलांचा अथवा इंग्रजांचा काळ असो किंवा ऊन, पाऊस आणि आजारपण असो, वारकऱ्यांची निष्ठा आणि वारीचे सातत्य कायम राहिले आहे. अशा या पवित्र भूमीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी जे जे आवश्यक आहे, ते सर्व सुविधा पुरवण्यास राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे.

नियोजन आणि सुविधांमध्ये आमूलाग्र बदल

या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी वारीच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे कौतुक केले. जयकुमार गोरे यांनी वारीचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले असून सुविधा पुरवण्याबाबत आमूलाग्र बदल घडवून आणले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘प्रत्येक वारकऱ्यामध्ये माऊली आहे’ याच भावनेतून प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी सेवा केल्यामुळेच हे मोठे परिवर्तन पंढरपुरात पाहायला मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीनंतरही पंढरपुरात स्वच्छता

स्वच्छतेच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आषाढी सोहळ्यासाठी लाखो वारकरी पंढरीत दाखल झाले असले, तरी पंढरपूर शहर स्वच्छ दिसत आहे. वारी पूर्ण झाल्यानंतरही पंढरपूरची ही स्वच्छता अशीच कायम राहील. दरवर्षी मागील वर्षापेक्षा अधिक उत्तम सेवा आणि सुविधा देण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती

या निर्मल वारी समारोप कार्यक्रमास आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार अभिजित पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार नारायण पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राजेंद्र राऊत तसेच माजी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.

प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार आमदार समाधान आवताडे यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 25-07-2026