Lote Pollution Protest: सोनगाव ग्रामस्थांचा आज ‘एमपीसीबी’ चिपळूण कार्यालयावर मोर्चा

लोटे एमआयडीसीतील रासायनिक प्रदूषणाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; दोषी कारखान्यांवर कठोर कारवाईची मागणी

खेड / चिपळूण:

लोटे प्रदूषण प्रकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या भीषण समस्येच्या निषेधार्थ सोनगाव ग्रामस्थांच्या वतीने २७ जुलै रोजी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ (एमपीसीबी) चिपळूण येथील उपप्रादेशिक कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्यामुळे झालेल्या पर्यावरणाच्या हानीविरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.

रासायनिक सांडपाण्याने ओढ्याचे पाणी झाले पांढरे

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै रोजी लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी थेट सोनगावच्या ओढ्यात मिसळल्याने अत्यंत भीषण प्रदूषण झाले. संपूर्ण ओढ्याचे पाणी दुधासारखे पांढरे शुभ्र झाले असून, यामुळे स्थानिक शेती, नैसर्गिक जलस्रोत आणि एकूणच पर्यावरणावर अत्यंत गंभीर परिणाम झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

कामबंदीच्या नोटिसांनंतरही कारखाने सुरूच असल्याचा आरोप

या घटनेनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणाशी संबंधित सहा कारखान्यांना कामबंदीच्या (क्लोजर) नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात त्यातील काही कारखाने अजूनही सुरूच असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रदूषण रोखण्यात आणि कारवाईची प्रभावी अंमलबजावणी करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली.

मोर्चातील प्रमुख मागण्या आणि निवेदनाची दखल

आयोजित मोर्चाच्या माध्यमातून दोषी कारखान्यांवर तत्काळ कठोर कारवाई करणे, परिसरातील प्रदूषण कायमस्वरूपी थांबवणे, दूषित पाण्याची वैज्ञानिक तपासणी करणे, तसेच नागरिकांचे आरोग्य आणि शेतीचे संरक्षण करणे या प्रमुख मागण्या केल्या जाणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेला ग्रामपंचायतीच्या वतीने आधीच निवेदन देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:05 27-07-2026