MSRTC Electric Bus Plan: २०३७ पर्यंत ‘लालपरी’ होणार १०० टक्के इलेक्ट्रिक!

MSRTC Electric Bus Plan: २०३७ पर्यंत 'लालपरी' होणार १०० टक्के इलेक्ट्रिक!

ताफ्यात दाखल होणाऱ्या ५ हजार डिझेल बसेस ठरणार शेवटच्या; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

MSRTC Electric Bus Plan अंतर्गत महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एसटी (MSRTC) महामंडळाचा ताफा २०३७ पर्यंत १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यापुढे एसटीच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या सुमारे ५ हजार डिझेल बसेस या शेवटच्या ठरणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने केवळ इलेक्ट्रिक बसेसचीच खरेदी केली जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी मुख्यालयात पार पडलेल्या ३१२ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.

१४ हजार बसेसपैकी सध्या ११०० ई-बसेस; ५ हजार जुन्या बसेस होणार स्क्रॅप

सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे १४ हजार बसेस धावत असून, त्यापैकी ११०० बसेस ई-बसेस आहेत. ताफ्यातील सुमारे ५ हजार जुन्या डिझेल बसेस नियमानुसार टप्प्याटप्प्याने स्क्रॅप (मोडीत काढणे) केल्या जाणार आहेत. यामुळे ताफ्याचे आधुनिकीकरण होण्यासोबतच डिझेलवरील अवलंबित्व कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

Amey jwelrs

२०२७ पासून जुन्या बसेसचे ई-बसमध्ये रूपांतरण

सात ते आठ वर्षे वापर झालेल्या जुन्या डिझेल बसेसचे २०२७ पासून टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरण (Retrofitting) करण्याची मोहीम राबवली जाणार आहे. डिझेल बसेसचे आयुर्मान १५ वर्षे असते, तर ई-बसेसचे आयुर्मान सुमारे २० वर्षे असल्याने या गाड्यांचा दीर्घकाळ वापर करता येईल आणि इंधन खर्चातही मोठी बचत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम वेगात

ई-बसेसच्या वाढत्या संख्येला आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन, विद्युत पायाभूत सुविधा आणि तांत्रिक यंत्रणा आगारनिहाय (Depot level) उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ई-बसेसची खरेदी आणि चार्जिंग सुविधांची उभारणी या दोन्ही प्रक्रिया समांतरपणे चालणार आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ भविष्यात पर्यावरणपूरक ‘ई-लालपरी’ म्हणून ओळखली जाईल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.