Ratnagiri Hit and Run: मांडवी भूते नाका येथे रस्ता ओलांडणाऱ्या ५४ वर्षीय महिलेला भरधाव दुचाकीची धडक

Ratnagiri Hit and Run: मांडवी भूते नाका येथे रस्ता ओलांडणाऱ्या ५४ वर्षीय महिलेला भरधाव दुचाकीची धडक

भरधाव ॲक्टिव्हाचालक धडक देऊन पसार; रत्नागिरी शहर पोलिसांत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मांडवी भूते नाका परिसरामध्ये रस्ता ओलांडत असलेल्या ५४ वर्षीय महिलेला भरधाव अज्ञात दुचाकीने जोरदार धडक दिल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून, धडक दिल्यानंतर पसार झालेल्या अज्ञात दुचाकीचालकाविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या वाहनचालकाचा शोध घेत आहेत.

रहाटघर पेट्रोल पंपजवळ दुचाकी पार्क करून जात असताना घडला अपघात

पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, हा अपघात २६ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी एसटी स्टँड ते भगवती बंदर जाणाऱ्या रोडवरील मांडवी भूते नाका येथे घडला. फिर्यादी सौ. सविता सुधीर चव्हाण (वय ५४, रा. फ्लॅट नं. १०२, गणराज रेसिडेन्सी, विनम्र नगर गोडाऊन स्टॉप, नाचणे, ता. व जि. रत्नागिरी) या आपल्या पतीसोबत दुचाकीवरून (क्र. एमएच ०८ एडी २३४६) मांडवी येथे आल्या होत्या. आपली दुचाकी रहाटघर पेट्रोल पंपात पार्क करून ते दोघे पायी मांडवीच्या दिशेने जात होते.

Tata tiago

भरधाव ॲक्टिव्हाने दिली जोरदार धडक

भूते नाका येथील चौकात रस्ता ओलांडत असताना, भगवती बंदरकडून रत्नागिरी एसटी स्टँडच्या दिशेने जाणाऱ्या एका ॲक्टिव्हासारख्या दिसणाऱ्या दुचाकीच्या अज्ञात चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. गाडी अत्यंत हयगयीने, अविचाराने आणि वेगात चालवून त्याने रस्ता ओलांडणाऱ्या सविता चव्हाण यांना जोरदार धडक दिली. या अपघातात सविता चव्हाण जखमी झाल्या असून, धडक दिल्यानंतर चालक वाहनासह पसार झाला.

रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा दाखल

या घटनेप्रकरणी २७ सप्टेंबर रोजी पहाटे ०३:५२ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गु.र.नं. ३७४/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५(क), मोटार वाहन कायदा कलम १८४ सह भा.दं.वि. २७९ व ३३७ अन्वये अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार चालकाचा शोध शहर पोलीस घेत आहेत.