Kashedi Ghat Container Accident: कशेडी घाटात ओल्या मच्छीने भरलेला कंटेनर उलटला

Kashedi Ghat Container Accident: कशेडी घाटात ओल्या मच्छीने भरलेला कंटेनर उलटला

डिझेल टँकमधून धुराचे लोट; महाड अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात २८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अलिबाग येथून रत्नागिरी येथे ओल्या मच्छीने भरलेला कंटेनर धामणदेवी गावाजवळ उलटून भीषण अपघात झाला. अपघातानंतर कंटेनरच्या डिझेल टँकजवळून धूर निघू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दीड किलोमीटर अंतरावरील वाहतूक एकेरी सुरू ठेवण्यात आली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या महाड एमआयडीसीच्या अग्निशमन बंबानी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवून कंटेनर रस्त्याच्या बाजूला केला.

अपघाताचा सविस्तर घटनाक्रम
कशेडी घाटात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अलिबाग येथून तारली मासळी घेऊन रत्नागिरीच्या दिशेने जाणारा कंटेनर (क्र. एमएच-०४-जेके-०३८१) धामणदेवी गावालगत उलटला. अपघातानंतर अचानक कंटेनरच्या डिझेल टँकजवळून धुराचे लोट उठू लागले, ज्यामुळे महामार्गावर भीतीचे वातावरण पसरले होते.

पोलीस व अग्निशमन दलाची तत्परता आणि मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार यांच्यासह महिला पोलीस अंमलदार जयश्री सरणेकर, सुतार, सौरभ जाधव, बीट मार्शल रामेश्वर साळुंखे, दामिनी पथक शीतल बनसोडे व केतकी सकपाळ यांनी अपघाताच्या ठिकाणी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी जखमी ड्रायव्हरला रुग्णवाहिकेतून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.

Tata nexon

त्याचवेळी महाड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाचे सब ऑफिसर चव्हाण, सुरेंद्र मोरे, विशाल म्हात्रे, विजय साठे, प्रवीण चिंचोले आदींनी कंटेनरच्या डिझेल टँकजवळून निघणाऱ्या धुरावर पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.