Ratnagiri Homeless Shelter Death: रत्नागिरीतील बेघर निवारा केंद्रातील वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

Ratnagiri Homeless Shelter Death: रत्नागिरीतील बेघर निवारा केंद्रातील वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

शरीर थंड पडल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल; शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

रत्नागिरी : शहरातील सामाजिक व प्रशासकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसरातील बेघर निवारा केंद्रात राहणाऱ्या ८५ वर्षीय वृद्धाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. वृद्धाचे शरीर पूर्णतः थंड पडल्याचे व कोणतीही हालचाल होत नसल्याचे तेथील इतर निवासींच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

सकाळी ६ च्या सुमारास घडला प्रकार

पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, गोविंद भिकाजी शितप (वय ८५, मूळ रा. कासारे आठवडा, जयगड, ता. व जि. रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव असून ते बाजारपेठेतील निवारा केंद्रात वास्तव्यास होते. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निवारा केंद्रातील निवासी जगन्नाथ मधुसुदन राणे यांनी फिर्यादी शिवानी संदीप पवार यांच्या मोबाईलवर संपर्क साधून गोविंद शितप हे कोणतीही हालचाल करत नसून त्यांचे शरीर थंड पडल्याची माहिती दिली.

Shanti2

खाजगी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात हलवले

माहिती मिळताच फिर्यादी शिवानी पवार यांनी तातडीने निवारा केंद्रात धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर शहर अभियान व्यवस्थापक श्री. काटकर यांना घटनेची कल्पना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार तातडीने खाजगी रुग्णवाहिका मागवून गोविंद शितप यांना रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (जिल्हा शासकीय रुग्णालय) हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून सकाळी ९:४५ वाजता त्यांना मृत घोषित केले.

रत्नागिरी शहर पोलिसांत नोंद

या दुर्दैवी प्रकरणाची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आमृ. क्रमांक १२२/२०२६ नुसार बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली असून घटनेचा पुढील कायदेशीर तपास पोलीस करत आहेत.