१५ दिवसांत अर्ज निकाली काढण्याची मागणी
राजापूर : राजापूर तालुक्यातील पोटखराबा जमिनींच्या सातबारा नोंदी दुरुस्त करून ‘वरकस’ अशी नोंद करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी जोरदार मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक नागले यांनी यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. महसूल विभागाकडे दाखल झालेले प्रलंबित अर्ज पुढील १५ दिवसांत निकाली न काढल्यास शेतकऱ्यांसह उपोषण करण्याचा स्पष्ट इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
फलबाग व भातशेती लागवडीनंतरही नोंदी प्रलंबित
शासनाच्या फळबाग लागवड योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेत राजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पडीक व पोटखराबा जमिनी लागवडीखाली आणल्या आहेत. प्रत्यक्ष क्षेत्रात फळबागायती व भातशेतीची लागवड झालेली असतानाही सातबारा उताऱ्यावर मात्र अद्याप ‘पडीक’ किंवा ‘पोटखराबा’ अशीच नोंद कायम आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिकांची ई-पीक पाहणी करताना अडचणी येत आहेत. तसेच पीक विमा, शेती नुकसान भरपाई आणि इतर सरकारी योजनांचे आर्थिक लाभ मिळण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.
महसूल विभागाच्या कारभारावर संताप आणि आंदोलनाचा इशारा
सातबारा नोंदी दुरुस्त करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे आधीच अर्ज दाखल केले आहेत. मात्र, काही प्रकरणांमध्ये दोन ते तीन वर्षे उलटूनही कोणतीही प्रशासकीय कारवाई झालेली नाही, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. काही ठिकाणी लाभ मिळाला तरी तो अत्यंत अल्प प्रमाणात मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे ‘पोटखराबा’ नोंदी दुरुस्त करून ‘वरकस’ म्हणून नोंद करण्याचे प्रलंबित अर्ज महसूल विभागाने १५ दिवसांत निकाली काढावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.














