Handicrafts Center Ratnagiri: रत्नागिरीत उभारणार आधुनिक हस्तकला केंद्र; पर्यटनासह स्थानिक महिलांना मिळणार रोजगाराच्या नव्या संधी

महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ आणि खादी ग्रामोद्योग मंडळाचा संयुक्त पुढाकार; MIDC कडून मिळणार जागा

रत्नागिरी:

Handicrafts Center Ratnagiri बाबत रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणि स्थानिक रोजगाराला मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात पर्यटन वाढवून जिल्ह्याच्या उत्पन्नात भर घालण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या (MSSIDC) माध्यमातून खादी ग्रामोद्योग मंडळाने रत्नागिरीत भव्य हस्तकला केंद्र सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवारी पार पडलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

MIDC कडून जागा अन् लघुउद्योग महामंडळाकडून निधी

या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देताना जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, हस्तकला केंद्रासाठी एमआयडीसीमार्फत (MIDC) योग्य जागेची उपलब्धता करून दिली जाईल, तर प्रकल्पासाठी लागणारा आवश्यक निधी महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाकडून पुरवला जाईल. हे हस्तकला केंद्र केवळ एक निर्मिती केंद्र न राहता पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र व्हावे आणि या माध्यमातून स्थानिक महिलांना मोठ्या प्रमाणावर शाश्वत रोजगार उपलब्ध व्हावा, अशा दृष्टीने खादी ग्रामोद्योग मंडळाने या प्रकल्पाचे मॉडेल संपूर्ण महाराष्ट्राला दीपस्तंभासारखे दाखवून द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

Handicrafts Center Ratnagiri: CMEGP योजनेचे उद्दिष्ट दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत पालकमंत्र्यांनी सर्व बँकर्सची विशेष बैठक घेऊन ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा’ (CMEGP) सविस्तर आढावा घेतला. बँकांनी आपली कामगिरी उंचावून दिलेले उद्दिष्ट येत्या दोन महिन्यांत पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

Tata motars punch

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांचा विशेष सत्कार केला जाईल, तर उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या किंवा सुमार कामगिरी करणाऱ्या बँकांबाबत कडक व वेगळा निर्णय घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. यासाठी नोडल अधिकाऱ्यांमार्फत सर्व प्रकरणांचा गतीने पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

प्रशासकीय प्रमुख व बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती

या बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, एमआयडीसीच्या क्षेत्रीय अधिकारी वंदना खरमाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर, खादी ग्रामोद्योगचे उपकार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील आणि अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कनसे यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी व सनदी अधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 28-07-2026