चिपळूण: बस थांब्यावर एसटी थांबत नसल्याने विद्यार्थी त्रस्त; ठाकरे शिवसेनेचे प्रशासनाला निवेदन

नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल व डी.बी.जे. कॉलेज परिसरातील बस स्टॉपचा प्रश्न गंभीर

चिपळूण: चिपळूण शहरातील नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल (मिरजोळी) येथील बस स्टॉपवर शाळकरी विद्यार्थ्यांना तब्बल तीन-तीन तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. बस थांब्यावर एसटी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून, या प्रकारामुळे विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

डी.बी.जे. कॉलेज परिसरातील थांब्यावरही तीच परिस्थिती

मिरजोळी येथील शाळा परिसरासोबतच डी.बी.जे. कॉलेज परिसरातील बस स्टॉपवरही एसटी बस वेळेवर किंवा नियमितपणे थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दररोज तासनतास थांब्यावर उभे राहूनही बस निघून जात असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत व घरी पोहोचण्यास विलंब होत आहे.

ठाकरे शिवसेनेचा प्रशासनाला इशारा; नियमित बस थांबवण्याची मागणी

या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेत ठाकरे शिवसेनेच्या वतीने एसटी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल मिरजोळी तसेच डी.बी.जे. कॉलेज बस स्टॉप येथे नियमितपणे एसटी बस थांबवण्यात यावी, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन सादर करताना ठाकरे शिवसेना शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, युवासेना शहरप्रमुख पार्थ जागुष्टे, युवासेनेचे आकाश कदम, राहुल गुरव, शाकीर अरकाटे आणि शुभम शिंदे उपस्थित होते. लवकरात लवकर यावर योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 05-08-2026