Guhagar: शृंगारतळी येथे क्षुल्लक कारणावरून दोघांना लोखंडी रॉडने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

दोघे गंभीर जखमी, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल

गुहागर: गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे दारू पिण्यावरून झालेल्या वादातून लोखंडी रॉडच्या साहाय्याने दोघांना अमानुषपणे मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मद्यप्राशनावरून झालेल्या वादातून अमानुष मारहाण

या घटनेबाबत निखिल विजय जानवळकर (वय २९, रा. जानवले, शृंगारतळी) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७:२० च्या सुमारास निखिल जानवळकर हे शृंगारतळी येथील राजलक्ष्मी टॉकीजच्या पाठीमागे असलेल्या एका घराजवळ मद्यप्राशन करण्यासाठी बसले होते.

त्याच वेळी मार्गताम्हाणे येथील आदित्य सावंत (वय ३२), मुंढर येथील दीप शिर्के (वय २६) आणि जीत शिर्के (वय २८) हे तिघे त्या ठिकाणी आले. त्यांनी निखिल जानवळकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या रोशन बाळकृष्ण धामणे व ऋतिक नारायण कातळकर या तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

दोघे गंभीर जखमी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या वादादरम्यान आदित्य सावंत याने हातातील लोखंडी रॉडने दोघांना जबर मारहाण केली. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

याप्रकरणी गुहागर पोलिसांनी आदित्य सावंत, दीप शिर्के आणि जीत शिर्के या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास चिपळूणचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 05-08-2026