Womens Asia Cup 2026 Schedule: महिला आशिया कप २०२६ वेळापत्रक जाहीर; ५ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान सामना; २८ ऑगस्टपासून रणसंग्राम

दुबईत रंगणार टी-२० क्रिकेटचा थरार; ८ संघांमध्ये १४ दिवस रंगणार १५ सामने

नवी दिल्ली:

आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) ‘महिला आशिया कप २०२६’ (Womens Asia Cup 2026 Schedule) स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या बहुप्रतिक्षित टी-२० स्पर्धेची सुरुवात २८ ऑगस्ट २०२६ पासून होणार असून, अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. क्रिकेट चाहत्यांचे सर्वात जास्त लक्ष लागून असलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला ५ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.

या स्पर्धेचे आयोजन टी-२० फॉरमॅटमध्ये केले जात असून ही महिला आशिया कपची सहावी आवृत्ती असणार आहे. स्पर्धेतील सर्व १५ सामने युएईमधील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६:३० वाजता खेळवले जातील.

दोन गटांत ८ संघांची विभागणी

या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे:

  • अ गट (Group A): भारत, पाकिस्तान, थायलँड, हाँगकाँग-चीन
  • ब गट (Group B): श्रीलंका, बांगलादेश, यूएई, इंडोनेशिया

ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघ आपल्या गटातील प्रतिस्पर्ध्यांविरोधात एक-एक सामना खेळेल. दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ अनुक्रमे १० आणि ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीत (Semifinals) प्रवेश करतील. उपांत्य फेरीतील विजेते संघ १३ सप्टेंबरला विजेतेपदाच्या अंतिम सामन्यासाठी आमनेसामने येतील.

भारतीय संघाचे सामने (Womens Asia Cup 2026 Schedule)

सामनादिनांक
भारत विरुद्ध थायलँड३० ऑगस्ट २०२६
भारत विरुद्ध हाँगकाँग३ सप्टेंबर २०२६
भारत विरुद्ध पाकिस्तान५ सप्टेंबर २०२६

श्रीलंका गतविजेता संघ म्हणून उतरणार

श्रीलंकेचा संघ या स्पर्धेत गतविजेता म्हणून मैदानात उतरेल. २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत श्रीलंकेने विजेतेपद पटकावले होते. श्रीलंकेचा या स्पर्धेतील पहिला सामना २९ ऑगस्ट रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. भारतीय संघ यंदाच्या स्पर्धेत कशी कामगिरी करतो, याकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:46 07-08-2026