मनोरुग्णालयाच्या शांत आवारात रंगला भक्तीचा मळा; उपचारार्थींनी छेडले आर्त सूर

मनोरुग्णालयाच्या शांत आवारात रंगला भक्तीचा मळा; उपचारार्थींनी छेडले आर्त सूर

जिल्हा माहिती कार्यालयाच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात विस्कटलेल्या मनांना लाभली संगीतमय मुक्तीची अनुभूती

रत्नागिरी : भिंतींना बंदिस्त असलेल्या आणि स्वतःच्याच विस्कटलेल्या विश्वात हरवलेल्या जीवांच्या कंठातून जेव्हा आर्त आळवणी उमटते, तेव्हा ईश्वरालाही पाझर फुटल्याशिवाय राहत नाही. ‘टाळ बोले चिपळीला.. नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग…’ हे शब्द कानावर पडत असताना रत्नागिरीतील मनोरुग्णालयातील वातावरण केवळ संगीतमय झाले नव्हते, तर ते एका अलौकिक मुक्तीच्या आनंदाने भरून गेले होते. निमित्त होते जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाचे; मात्र औचित्य ठरले ते मनोरुग्णालयाच्या शांत आवारात भक्तीचा मळा फुलवणाऱ्या एका हृदयस्पर्शी साक्षात्काराचे.

अभंगांतून विचारला विषमतेच्या जगाला सवाल :
ज्या जगाने त्यांना अनेकदा दुर्लक्षित केले, त्या जगाला विसरून मनोरुग्णालयातील या उपचारार्थींनी जेव्हा टाळ-मृदंगाच्या तालावर सूर छेडले, तेव्हा उपस्थित सर्वजण भारावून गेले. संत तुकडोजी महाराजांच्या ‘प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी, पहिला खातो तूप रोटी, दुसरा खातो मीठ भाकरी, तिसरा राहतो उपाशी…’ या रचनेतून उमटलेला आर्त सवाल उपस्थित सुजाण समाजाच्या थेट काळजाला भिडला. विषमतेच्या आणि स्वतःच्या नशिबाच्या खेळावर त्यांनी सुरांच्या माध्यमातून विचारलेला हा प्रश्न उपस्थितांपैकी प्रत्येकाला अंतर्मुख करणारा ठरला.

भक्तिगीतांनी साक्षात पंढरपूर अवतरल्याचा भास :
त्यानंतर जेव्हा ‘देव माझा विठू सावळा.. माळ त्याची माझिया गळा, विठु माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, कशाला जाता दूर घरातच पंढरपूर…’ हे भक्तिगीत वातावरणात घुमले, तेव्हा जणू साक्षात विठ्ठलानेच त्या चार भिंतींच्या आत प्रवेश केल्याचा भास झाला. केवळ अभंगच नव्हे, तर ‘अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची…’ या गणरायाच्या वंदनेवर थिरकणाऱ्या त्यांच्या पावलांनी हेच सिद्ध केले की, मनावर कितीही आघात झाले तरी आत्म्यातील कला आणि उपजत आनंद कधीही कोमेजत नाही.

Vinayka motars

मायेच्या ओलाव्याने सांधली विस्कटलेली मने :
हा केवळ एक औपचारिक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता; तर तो प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरिणाक्षी गोसावी आणि त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय चमूच्या अथांग मायेचा आणि विश्वासाचा विजय होता. ज्यांना रुग्ण मानले जात होते, त्यांनी स्वतःच्या कलेने क्षणात कलाकाराचे रूप धारण करून सर्वांना थक्क केले. औषधांपेक्षाही अधिक गुणकारी ठरणाऱ्या प्रेमाने विस्कटलेल्या मनांना पुन्हा कसे सांधता येते, याची साक्ष त्या क्षणी प्रत्येकाने अनुभवली. त्या दिवशी मनोरुग्णालयाच्या शांत प्रांगणात कोणताही भेद उरला नव्हता; उरला होता फक्त भक्तीचा निखळ झरा आणि सुरांच्या पावसात स्वतःला विसरून नाचणारे विठ्ठलाचे लाडके वारकरी.