शेतात काम करताना सर्पदंश झालेल्या गोळप येथील वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू

शेतात काम करताना सर्पदंश झालेल्या गोळप येथील वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू

कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात महिनाभराच्या उपचारानंतर प्राणज्योत मालवली; पूर्णगड पोलीस ठाण्यात नोंद

रत्नागिरी:
शेतात काम करत असताना साप चावल्याने गंभीर जखमी झालेल्या रत्नागिरी तालुक्यातील गोळप धोपटवाडी येथील ६० वर्षीय वृद्धेचा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (१५ सप्टेंबर) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

१५ ऑगस्ट रोजी शेतात घडली होती घटना

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिता अनंत उभारे (वय ६०, रा. धोपटवाडी गोळप, ता. रत्नागिरी) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे. त्या १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गोळप येथील शेतात काम करत असताना त्यांना विषारी सापाने चावा घेतला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

Rotery school

महिनाभराच्या उपचारांनंतर मृत्यू

जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने १८ ऑगस्ट रोजी त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी कोल्हापूर येथील शासकीय छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयात हलवण्यात आले. सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर महिनाभर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

कोल्हापूरवरून पूर्णगड पोलिसांत गुन्हा वर्ग

या घटनेची नोंद कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, झिरो नंबरने हा आकस्मिक मृत्यूचा गुन्हा रत्नागिरीतील पूर्णगड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पूर्णगड पोलीस या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.