अभ्यासू वृत्ती आणि भाषाप्रभुत्वामुळे राज्यभरात चर्चा; जुन्या सत्कार सोहळ्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल
रत्नागिरी : पुण्यातील गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजे आणि डॉल्बी सिस्टीमवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला सडेतोड जाब विचारणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहेत. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व, अचूक संदर्भ आणि अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे त्यांच्या विद्वत्तेचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे विद्यानंद बापट हे मूळचे कोकणातील रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावचे सुपुत्र असून, त्यांच्यातील ही गुणवत्ता ओळखून तब्बल २२ वर्षांपूर्वी म्हणजेच २००४ मध्ये गोळपवासीयांनी तत्कालीन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांचा जाहीर गौरव केला होता.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला होता सत्कार :
रत्नागिरी तालुक्यातील गोळप पंचशीलनगर येथे २००४ मध्ये आदर्श युवक मंडळातर्फे दहावी, बारावी आणि उच्चशिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवकचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष उदय सामंत उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल विद्यानंद बापट यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले होते. मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष अविनाश काळे, राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश चिटणीस स्वर्गीय कुमार शेट्ये, गोळपच्या तत्कालीन सरपंच अस्मिता गोरे, उषा काळे, नारायण आग्रे, केशव पालकर, बी. के. पालकर, महेश भाटकर, प्रदीप डोंगरे आणि दिलीप पावसकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
रत्नागिरीच्या फाटक हायस्कूल व गोगटे कॉलेजमध्ये झाले शिक्षण :
विद्यानंद बापट यांचे इयत्ता नववीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील प्रसिद्ध न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंब मूळ गावी कोकणात आल्याने त्यांचे पुढील शालेय शिक्षण रत्नागिरीतील फाटक हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. शालेय जीवनापासूनच त्यांची हुशारी, अफाट वाचन आणि आकलनशक्ती शिक्षकांच्या व ग्रामस्थांच्या लक्षात आली होती. त्यानंतर रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून त्यांनी बी. कॉम.चे शिक्षण पूर्ण केले आणि ते गुणवत्ता यादीत (मेरिट) तिसऱ्या क्रमांकावर चमकले. त्यानंतर त्यांनी एम. कॉम. पूर्ण करून सीएची परीक्षाही दिली, अशी माहिती त्यांचे वडील सुहास बापट यांनी दिली.

२२ वर्षांपूर्वीची बातमी सोशल मीडियावर व्हायरल :
विद्यानंद बापट यांच्या २००४ मधील सत्कार सोहळ्याच्या बातम्या आणि छायाचित्रे तत्कालीन स्थानिक दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाली होती. सध्या बापट यांच्या भूमिकेची चर्चा सुरू असतानाच, २२ वर्षांपूर्वी दैनिक ‘तरुण भारत’ आणि दैनिक ‘भैरव टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्या बातमीची कात्रणे आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहेत. स्वातंत्र्यसैनिक एस. एम. जोशी यांचे मूळ गाव असलेले गोळप हे गाव आता विद्यानंद बापट यांनी पुण्यात घेतलेल्या रोखठोक, अभ्यासपूर्ण भूमिकेमुळे आणि त्यांच्या लहानपणापासूनच्या गुणवत्तेमुळे पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आले आहे.













