४,५०० रुपयांची लाच घेताना एसीबीने पकडले होते रंगेहाथ; आरोग्य उपसंचालकांकडून कारवाईचे आदेश
रत्नागिरी:
कामथे उपजिल्हा रुग्णालयात गर्भपातासाठी आवश्यक असणारे किट (गोळ्या) देण्याच्या बदल्यात एका गरोदर महिलेकडे ४ हजार ५०० रुपयांची लाच घेतल्याचा गंभीर आरोप असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन शिरीष मदार (वय ४८, रा. पागमळा, चिपळूण) हिच्यावर अखेर निलंबनाची कडक कारवाई करण्यात आली आहे.
डॉ. मदार ही वर्ग-२ अ गटातील वैद्यकीय अधिकारी असल्याने तिच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून आरोग्य उपसंचालक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. या प्रस्तावावर आरोग्य विभागाकडून अंतिम निर्णय घेण्यात आला असून तिला शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
खासगी कारमध्ये स्वीकारली होती लाच
कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ३ जून रोजी सायंकाळी ४,५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. तक्रारदार गरोदर महिलेकडून लाचेची ही रक्कम डॉ. मदार हिने तिच्या ‘MH 08 AX 2618’ या क्रमांकाच्या खासगी चारचाकी वाहनात स्वीकारली होती.
लाच स्वीकारताच आधीच सापळा रचून दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचांसमक्ष तिला ताब्यात घेतले. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईमुळे जिल्हा आरोग्य विभागासह संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 07-08-2026














