पळस्पे ते महाड, खेड ते हातखंबा आणि सिंधुदुर्गात २० ब्लॅक स्पॉट निश्चित; चाकरमान्यांचा प्रवास खडतर
ठाणे:
Mumbai Goa Highway Potholes Black Spots 2026 अंतर्गत मुंबई-गोवा मार्गावर या गणेशोत्सवात पूर्ण रस्ता उपलब्ध करून देण्याच्या घोषणा केंद्रीय दळणवळण मंत्र्यांपासून ते राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांपर्यंत सर्वांनी केल्या असल्या, तरी वास्तव अत्यंत विदारक आहे. या गणेशोत्सवातही मुंबई-गोवा महामार्गावर तब्बल २० ठिकाणे अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. यामध्ये पळस्पे ते महाड, खेड ते हातखंबा आणि सिंधुदुर्गातील विविध भागांचा समावेश आहे.
धोकादायक २० ठिकाणे ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचा मोठा धोका असलेली तब्बल २० ठिकाणे (ब्लॅक पॉट्स) प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली आहेत. महामार्गाचे चौपदरीकरण गेली १८ वर्षे रखडले असून अपघातांचे सत्र रोखण्यात यश आलेले नाही. गणेशोत्सवाच्या गर्दीत कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून महामार्ग पोलीस आणि राज्य पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये आली आहे.
- रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक १७ ब्लॅक स्पॉट: पळस्पे ते पोलादपूर या १५० किलोमीटरच्या टप्प्यात सर्वाधिक १७ अपघातप्रवण ठिकाणे आढळली आहेत. यामध्ये नागोठणे जवळील सुकेळी खिंड, गोरेगाव तालुक्यातील रेपोली, लोणेरे, तळेगाव पेट्रोल पंप (दोन्ही बाजू), माणगाव तालुक्यातील कशेणे, महाड तालुक्यातील टेमपाले, टेमपाले ते लाख पाले, पहेल, पेण तालुक्यातील शेठफळ, व्रणकोप, रामवाडी, वाशीफाटा, तसेच पोलादपूर तालुक्यातील चोळई, धामणदेवी, लोहारे, पार्ले आणि डोल्वी या ठिकाणांचा समावेश आहे.
- रत्नागिरी व सिंधुदुर्ग टप्पा: रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग १६६ वरील देवरुख-दामोळे परिसरही धोकादायक घोषित झाला आहे. याशिवाय सुकेळी, वीर, राजापूर, कामते, भोस्ते, हातखंबा, पाली अशा अनेक ठिकाणी रस्ता धोकादायक बनला आहे.
५० लाखांपेक्षा जास्त चाकरमान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावरून सुमारे ५० लाखांपेक्षा जास्त चाकरमानी कोकणात प्रवास करतात. मात्र, पळस्पेपासून सिंधुदुर्गापर्यंत ७७० किमीच्या या महामार्गावर नियोजनाअभावी जागोजागी रस्ता अपुरा आहे.
- तांत्रिक त्रुटी आणि खड्डे: महामार्गाला वळणांचा उतार, दृश्य अंतर, आणि पाणी जाण्याची व्यवस्था यावर विशेष लक्ष दिलेले नाही. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या कोकण विभागात पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नसल्याने कर्नाळा परिसरात अपघाताची शक्यता वाढली आहे.
- अयोग्य जोडणी: खेड आणि संगमेश्वर भागात ‘एस’ (S) आकाराची जोडणी आणि हातखंबा पुलाजवळ तीव्र उतार व वळण यामुळे नवीन ब्लॅक स्पॉट तयार झाले आहेत.
प्रवाशांची दैनावस्था:
‘गणपती उत्सवासाठी या कोकण आपलाच आहे’ असे सांगून सुखदायी प्रवासाचे स्वप्न राजकीय नेत्यांकडून दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात नेहमीच्या पावसाळ्याप्रमाणे महामार्गाचे दुखणे कायम आहे. एका बाजूला वाहतूक कोंडी आणि दुसऱ्या बाजूला अपघातप्रवण क्षेत्र यामुळे यंदाही चाकरमान्यांची मोठी रखडपट्टी होणार असल्याचे स्पष्ट आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:03 17-08-2026














