Amba Ghat Inspection News: आमदार किरण सामंत अधिकाऱ्यांसह आज आंबा घाटाची पाहणी करणार

दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आरटीओ अधिकारी राहणार उपस्थित; कायमस्वरूपी उपायांवर होणार चर्चा

रत्नागिरी: आंबा घाटातील रस्त्याची झालेली दुरवस्था आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनल्याने, लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी या समस्येची तातडीने दखल घेतली आहे. १८ ऑगस्ट रोजी आमदार सामंत हे रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आंबा घाटात सविस्तर पाहणी करणार आहेत.

पावसाने रस्ता खचण्याची दाट शक्यता; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आंबा घाट हा व्यापारी व वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या घाटातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या असून रस्ता खचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या धोकादायक परिस्थितीमुळे प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असून, वाहतूक सुरळीत ठेवणे व अपघात टाळणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरले आहे.

संयुक्त पाहणी दौरा आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार किरण सामंत यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्क केले असून दोन्ही जिल्ह्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणीचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी होणाऱ्या या दौऱ्यात रत्नागिरी व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी करतील.

पाहणीनंतर घाटातील वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबत आणि प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याबाबत सविस्तर चर्चा होईल. तसेच घाटातील या समस्येवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांचे ठोस निर्णय या बैठकीत घेतले जाण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, पुणे येथील एका संस्थेकडून घाटाची पाहणी करण्यात आली असून तिच्या अहवालाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 18-08-2026