रत्नागिरी, साखरीनाटे आणि हर्णेनंतर आता जयगड बंदरातही लवकरच चौथे ड्रोन होणार कार्यान्वित
रत्नागिरी: महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सुरू असलेली अवैध आणि अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्ह्यात ड्रोनद्वारे गस्त घालण्याचा प्रभावी उपक्रम राबवला जात आहे. समुद्र खवळलेला असताना किंवा हवामान खराब असताना गस्ती नौका समुद्रात पाठवणे धोक्याचे ठरत असल्याने, मत्स्य विभागाने आता पारंपरिक गस्तीसोबतच ड्रोनच्या मदतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, आतापर्यंत सुमारे १५०० नौकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तीन महत्त्वाच्या बंदरांवर ड्रोन कार्यान्वित; लाखो रुपयांचा दंड वसूल
किनारपट्टीवरील सुरक्षेसाठी सुरवातीला रत्नागिरी जिल्ह्याला तीन विशेष ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले होते. हे ड्रोन सध्या रत्नागिरी, साखरीनाटे आणि हर्णे या तीन प्रमुख बंदर परिसरात सुरळीतपणे कार्यरत आहेत. ड्रोनने टिपलेली छायाचित्रे आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे मत्स्य विभागाने गेल्या वर्ष-दीड वर्षात सुमारे १५०० बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौकांवर धडक कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे.
२४ किमी मारक क्षमता; जयगड येथे चौथे ड्रोन लवकरच दाखल होणार
रत्नागिरी जिल्ह्यातील या प्रयोगाच्या यशानंतर आता जयगड बंदरासाठी आणखी एक नवीन ड्रोन लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहे. या आधुनिक ड्रोनची मारक क्षमता २४ किलोमीटर लांबीपर्यंत असल्याने किनारपट्टीपासून १२ नॉटिकल मैलांच्या सागरी हद्दीत अचूक नजर ठेवणे शक्य झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच नवीन मासेमारी हंगामाला सुरुवात झाली असून, शासकीय नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे.
दिवसाला ४८ हजार रुपये खर्च; सुरक्षेसाठी तीन वेळा फेऱ्या
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका ड्रोनसाठी दिवसाला १६ हजार रुपये खर्च येतो. त्यानुसार तिन्ही ड्रोनचा मिळून दिवसाचा एकूण खर्च ४८ हजार रुपये इतका आहे. हे ड्रोन प्रत्यक्षात ज्या दिवसांत वापरले जातात, केवळ त्याच दिवसांचे भाडे पुणे येथील संबंधित पुरवठादार कंपनीला मत्स्य विभागाकडून दिले जाते. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक ड्रोन ठरवून दिलेल्या सागरी हद्दीत दिवसातून तीनवेळा फेऱ्या मारून अचूक गस्त घालतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 18-08-2026














