बैलगाड्यांसह चिखल नांगरणी स्पर्धा भरवून प्रशासनाचा निषेध; रस्ते दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा
लांजा: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेच्या वतीने स्वातंत्र्यदिनी अनोखे आंदोलन छेडण्यात आले. महामार्गावरील खड्ड्यांमध्ये थेट बैलगाड्यांच्या साहाय्याने चिखल नांगरणी करून प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. या लक्षवेधी आंदोलनामुळे लांजा शहरातील रस्त्यांचा आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कुक्कुटपालन केंद्र ते तहसील कार्यालयापर्यंत रस्त्याची दुरवस्था
लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शहरातील कुक्कुटपालन केंद्रापासून ते थेट तहसील कार्यालयापर्यंत महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सततच्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी आणि चिखल साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून, पादचारी व स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
चिखल नांगरणी स्पर्धा आणि शेतकऱ्यांचा गौरव
स्थानिक अंतर्गत रस्ते आणि महामार्गाच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागण्या करूनही ठोस कारवाई होत नसल्याने हे पाऊल उचलण्यात आले. युवा सेनेचे तालुका अधिकारी अभिजित राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. या वेळी खड्ड्यांमध्ये बैलगाड्या आणून चिखल नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा
या आंदोलनात जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, अल्लाउद्दीन नेवरेकर, शहराध्यक्ष मोहन तोंडकरी, लक्ष्मण मोर्ये, राजू सुर्वे, बाबू गुरव, बाबा धावणे, चंद्रकांत शिंदे आणि मांडवकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाने लांजा शहरातील महामार्ग व अंतर्गत रस्त्यांची तातडीने डागडुजी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 18-08-2026














