ओला आणि सुका कचरा थेट महामार्गावर ओतल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर; प्रशासनाविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप
खेड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील वेरळ आणि भरणे गावांच्या दरम्यान असलेल्या जगबुडी नदीवरील पुलाजवळ वेरळ ग्रामपंचायतीची कचरा घंटागाडी थेट महामार्गालगतच कचरा टाकत असल्याचा संतापजनक प्रकार निदर्शनास आला आहे. सार्वजनिक स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडूनच अशा प्रकारे बेजबाबदारपणे कचरा टाकला जात असल्याने स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ओला व सुका कचरा एकत्र करून थेट महामार्गावर; दुर्गंधीने प्रवासी त्रस्त
वेरळ ग्रामपंचायतीकडून परिसरातील कचरा संकलित करण्यासाठी वापरण्यात येणारी घंटागाडी जगबुडी नदीच्या पुलाजवळ महामार्गालगत आणून त्यातील कचरा थेट रस्त्याच्या बाजूला ओतण्यात आला. या वेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी ओला आणि सुका कचरा वेगळा न करता एकत्रितपणे या ठिकाणी आणून टाकला. काही नागरिकांनी या प्रकारावर आक्षेप नोंदवूनही पुढे काही तास घंटागाडीतून कचरा टाकण्याचे काम सुरूच ठेवण्यात आले होते.
आरोग्याला मोठा धोका; ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
राष्ट्रीय महामार्गासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गालगतच कचरा साचल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून माशा व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दररोज हजारो वाहनांची ये-जा असणाऱ्या या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे महामार्गाच्या स्वच्छतेबाबत आणि सौंदर्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन महामार्गावरच असा प्रकार घडत असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रशासकीय कारवाईची आणि ठोस उपाययोजनांची मागणी
सार्वजनिक स्थानिक स्वराज्य संस्थेकडून घडलेल्या या बेजबाबदार प्रकाराची राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग, आरोग्य विभाग तसेच खेड तालुका प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर व जबाबदारांवर कडक कारवाई करून महामार्गालगत कचरा टाकण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन काय ठोस उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 18-08-2026














