स्वातंत्र्यदिनी भरदुपारी १२ हजारांची दुचाकी चोरीला; रत्नागिरी शहर पोलिसांत भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील गयाळवाडी परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने १२ हजार रुपये किंमतीची जुनी टीव्हीएस व्हिक्टर मोटारसायकल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ ते पावणेचार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी गायब
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी हनमंत देवाप्पा पाटील (वय ३४, व्यवसाय- गवंडी, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी; मूळ रा. किरहर्षी, ता. खानापूर, जि. बेळगाव, कर्नाटक) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पाटील यांनी आपली काळ्या रंगाची जुनी वापरती टीव्हीएस व्हिक्टर मोटारसायकल (क्रमांक MH 08 AR 0930) गयाळवाडी येथील जितेंद्र साळवी यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती.
१२ हजारांची दुचाकी लंपास; शहर पोलिसांकडून तपास सुरू
दुपारी २ ते ३.४५ या कालावधीत कोणीतरी अज्ञात इसमाने पाटील यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने ही मोटारसायकल चोरून नेली. चोरीस गेलेल्या या दुचाकीची किंमत सुमारे १२ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या चोरीच्या घटनेचा पुढील अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 18-08-2026














