Ratnagiri: जिल्ह्यातील शिवमंदिरांत भाविकांची गर्दी; पहिल्या श्रावणी सोमवारी मार्लेश्वरमध्ये वेशसंहिता लागू

तृणबिंदुकेश्वर, काशिविश्वेश्वर आणि धूतपापेश्वर मंदिरात धार्मिक कार्यक्रम

रत्नागिरी: पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त १७ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख शिवमंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध तृणबिंदुकेश्वर मंदिर तसेच जवळच असलेल्या राजिवडा येथील काशिविश्वेश्वर मंदिर परिसर सकाळपासूनच भाविकांच्या उपस्थितीने गजबजून गेला होता.

तृणबिंदुकेश्वर मंदिरात महिनाभर संततधार अभिषेक; दुधाच्या अभिषेकाने महादेवाची पूजा

तृणबिंदुकेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच संततधार अभिषेकाला सुरुवात झाली असून, हा धार्मिक विधी संपूर्ण महिनाभर निरंतर चालणार आहे. पहिल्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध शिवमंदिरांमध्ये महादेवाला दुधाचा अभिषेक घालण्यात आला तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मार्लेश्वरमध्ये वेशसंहिता लागू; भारतीय संस्कृतीला साजेसा वेश परिधान करण्याचे आवाहन

शहरातील भागेश्वर मंदिरासह राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध धूतपापेश्वर मंदिर आणि संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थानामध्ये सकाळपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, मार्लेश्वरचा धबधबा प्रसिद्ध असल्याने येथे भाविकांसोबत पर्यटकांची मोठी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर मार्लेश्वर देवस्थान ट्रस्टने मंदिरात वेशसंहिता (ड्रेस कोड) लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भाविकांनी भारतीय संस्कृतीला साजेसा, पूर्ण आणि अंगभर वेश परिधान करूनच मंदिरात प्रवेश करावा, असे स्पष्ट निर्देश ट्रस्टकडून जाहीर करण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 18-08-2026