Ratnagiri: साळवी स्टॉप मार्गावर एल.जी. शोरूमसमोर अपघात; दुचाकीस्वाराला धडक देऊन चालक पसार

ज्येष्ठ नागरिक अपघातात जखमी; अज्ञात मोटारसायकल चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी: हातखंबा ते साळवी स्टॉप मार्गावर जे.के. फाईल्स परिसरातील एल.जी. शोरूमजवळ एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने एक्सेस स्कुटरला मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात स्कुटरस्वार जखमी झाले असून, धडक दिल्यानंतर कोणतीही वैद्यकीय मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता आरोपी चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एल.जी. शोरूमसमोर घडला अपघात; ६२ वर्षीय नागरिक जखमी

ही घटना १८ जुलै रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास जे.के. फाईल्स समोरील एल.जी. शोरूमजवळ घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश वसंत तटकरी यांनी मोटार अपघात चौकशीअंती हा गुन्हा दाखल केला आहे.

जे.के. फाईल्स परिसरात राहणारे चंद्रशेखर सखाराम जोशी (वय ६२, रा. घर नं. १०३०, धनसंपदा, रत्नागिरी) हे १८ जुलै रोजी आपल्या ताब्यातील एक्सेस स्कुटरने (क्रमांक MH 08 BG 7834) साळवी स्टॉपच्या दिशेने जात होते. एल.जी. शोरूमसमोर आले असता मागून आलेल्या एका अज्ञात दुचाकी चालकाने आपले वाहन बेदरकारपणे आणि हयगईने चालवून जोशी यांच्या स्कुटरला मागून धडक दिली. या अपघातात चंद्रशेखर जोशी रस्त्यावर पडल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली.

पोलिसांत विविध कलमांन्वये गुन्हा नोंद; चालकाचा शोध सुरू

अपघात घडल्यानंतर आरोपी दुचाकी चालकाने जखमीला मदत न करता अथवा अपघाताची माहिती पोलीस ठाण्यात न देता घटनास्थळावरून पोबारा केला.

Vinayka motars

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात मोटारसायकल चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), मोटर वाहन कायदा कलम १८४, १३४(ब)/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या हिट अँड रन प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 18-08-2026