बचतगटाचे पैसे आणि सोन्याचे मंगळसूत्र लाटल्याचा आरोप
दापोली, रत्नागिरी:
Dapoli Crime News (दापोली): दापोली तालुक्यातील गिम्हवणे-धुतारवाडी येथे सोन्याचे दागिने परस्पर बँकेत गहाण ठेवून तसेच कर्जासाठी मिळालेली रक्कम परत न करता तब्बल ९ लाख ६० हजार रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात पती-पत्नीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, १७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९.१६ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
Dapoli Crime News: दागिन्यांसह बचतगटाच्या पैशांवर मारला डल्ला
या प्रकरणी पूर्वा गणेश देवघरेकर (वय ३८, रा. गिम्हवणे-धुतारवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी दापोली पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून प्रतिज्ञा विश्वास देवघरेकर (३१) आणि विश्वास रमेश देवघरेकर (३८, दोघेही रा. गिम्हवणे-धुतारवाडी, ता. दापोली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तक्रारीनुसार, १६ मे २०२६ रोजी संशयित प्रतिज्ञा देवघरेकर व विश्वास देवघरेकर यांनी फिर्यादी पूर्वा देवघरेकर यांच्याकडून अंगावर परिधान करण्यासाठी सोन्याचे दागिने मागून घेतले होते. या दागिन्यांमध्ये सुमारे ६ तोळे वजनाच्या सोन्याच्या मंगळसूत्राचा समावेश होता. मात्र, हे दागिने फिर्यादीला परत न करता संशयितांनी ते परस्पर बँकेत गहाण ठेवले अन् वारंवार मागूनही ते परत केले नाहीत.
बचतगटातील महिलांचे लाखो रुपये लाटले
संशयित प्रतिज्ञा देवघरेकर ही ‘विश्वकर्मा महिला मंडळ बचतगटाची’ अध्यक्षा म्हणून कार्यरत होती. अध्यक्षा या नात्याने तिने बचतगटातील इतर महिलांच्या कर्जाची परतफेड करण्याची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली होती. फिर्यादी पूर्वा देवघरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महिलेने बचतगटातील १२ महिलांकडून कर्जाच्या परतफेडीसाठी सुमारे ४ लाख ६० हजार रुपये गोळा केले, मात्र ही रक्कम बँकेत जमाच केली नाही.
याशिवाय, एचडीएफसी (HDFC) बँकेमार्फत या बचतगटाच्या माध्यमातून १० लाख रुपयांचे कर्ज मिळाले होते. हे कर्ज नियमानुसार हप्त्यापोटी बँकेत भरणे आवश्यक असताना, संशयितांनी फिर्यादीकडून मिळालेली ५ लाख रुपयांची रक्कम कर्जाच्या हप्त्यासाठी न वापरता तिचा अपहार केला.
एकूण ९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक; पोलीस तपास सुरू
सोन्याचे ६ तोळे मंगळसूत्र परस्पर गहाण ठेवणे, १२ महिलांकडून जमा केलेले ४.६० लाख रुपये बँकेत न भरणे आणि कर्जाचे ५ लाख रुपये लाटणे असा एकूण ९ लाख ६० हजार रुपयांचा गैरव्यवहार संशयितांनी केला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 19-08-2026














