Tukaram Mundhe FDA Action: विमल इलायचीच्या जाहिरातीप्रकरणी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस!

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची प्रतिक्रिया; ‘सरोगेट जाहिरात’ करत बंदी असलेल्या उत्पादनाचा प्रचार केल्याचा ठपका

मुंबई:

Tukaram Mundhe FDA Action (तुकाराम मुंढे एफडीए कारवाई): महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यात धडक कारवायांचे सत्र सुरू केले आहे. आता एफडीएने आपला मोर्चा थेट बॉलिवूडच्या बड्या स्टार्सकडे वळवला आहे. ‘विमल इलायची’च्या (Vimal Elaichi) जाहिरातीप्रकरणी बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना अन्न व औषध प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर; दररोज ठिकठिकाणी कारवाया

तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या एफडीए विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून भेसळयुक्त खाद्यपदार्थ, आरोग्याला हानीकारक उत्पादने आणि अस्वच्छ हॉटेल्सवर कारवाईचा धडाका लावला आहे.

राज्यातील विविध भागांत एफडीएच्या पथकांकडून दररोज हॉटेल्स, डेअरी आणि दुकानांवर छापे टाकले जात असून भेसळयुक्त माल जप्त केला जात आहे. तसेच अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांचे परवाने थेट निलंबित केले जात आहेत.

Tukaram Mundhe FDA Action: इलायचीच्या नावाने ‘सरोगेट ॲडव्हर्टाइजमेंट’

अभिनेत्यांना नोटीस बजावल्यानंतर पीटीआयशी (PTI) बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कारवाईमागची भूमिका स्पष्ट केली. “विमल ही कंपनी गुटख्याचे उत्पादन आणि विक्री करते. ‘इलायची’ची जाहिरात असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात ही महाराष्ट्रात प्रतिबंधित (Banned) असलेल्या उत्पादनाची अप्रत्यक्ष म्हणजेच सरोगेट जाहिरात (Surrogate Advertisement) असल्याचे तपासात दिसून आले आहे,” असे मुंढे यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, “विमल कंपनी सध्या महाराष्ट्रात उत्पादन करत नसली, तरी एफडीएच्या शोध व जप्ती कारवायांदरम्यान अनेक ठिकाणी ‘विमल प्रॉडक्ट्स’ गुटखा म्हणूनच विकले जात असल्याचे आढळले आहे. त्यामुळे इलायचीच्या नावाखाली दाखवली जाणारी जाहिरात हा बंदी असलेल्या पदार्थाचा प्रचार करण्याचाच प्रकार आहे. याच कारणामुळे आम्ही संबंधित कलाकारांकडून स्पष्टीकरण मागवले आहे.”

‘विमल’ ब्रँडच्या जाहिरात मोहिमेचा वादग्रस्त इतिहास

‘विमल’ ब्रँड आपल्या जाहिरातींमुळे कायदेशीर अडचणीत सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१८ मध्ये ‘डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस’ने (DGHS) ‘विष्णू पाउच पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड’ला नोटीस पाठवली होती.

त्यावेळी कंपनीवर इतर उत्पादनांच्या आडून अप्रत्यक्षपणे तंबाखूचा प्रचार केल्याचा आरोप होता. कंपनीने या कारवाईला न्यायालयात आव्हान दिले होते आणि आपण देशांतर्गत बाजारासाठी तंबाखू उत्पादने तयार करत नसल्याचे म्हटले होते. हा वाद न्यायालयात प्रदीर्घ काळ चालल्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने DGHS चे अपील फेटाळून लावले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 19-08-2026