Devrukh School News: कोंडगाव केंद्रशाळेतील शौचालय बांधकामात मोठा घोळ!

शासकीय पाहणी अहवालात निकृष्ट कामाचा पंचनामा; दरवाजे थेट भिंतीला ठोकले, सांडपाण्याच्या निचऱ्याची सोयच नाही

देवरूख:

Devrukh School News (देवरूख): स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कोंडगाव बाजारपेठ केंद्र शाळा क्रमांक १ येथे लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या शौचालयाच्या बांधकामातील निकृष्ट आणि बेजबाबदार कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासकीय पाहणी अहवाल तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पत्रातून या बांधकामातील गंभीर त्रुटी उघड झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, शौचालयाचे दरवाजे चौकट न लावता थेट भिंतीला ठोकण्यात आल्याने ते आतापासूनच सुटू लागले आहेत. हे दरवाजे विद्यार्थ्यांच्या अंगावर पडून गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

Devrukh School News: सांडपाण्याचा निचरा नाही अन् व्हेंटिलेशनची जाळीही गायब

ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, संगमेश्वर (देवरूख) यांच्या पाहणी अहवालानुसार (जा.क्र. उविसं/दे/ग्रापापु/६५८), शौचालयातील सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी आवश्यक स्लोप आणि आऊटलेटची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे सांडपाणी परिसरात साचून अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

अंदाजपत्रकात व्हेंटिलेशनसाठी जाळीची तरतूद असतानाही प्रत्यक्षात आवश्यक जाळी न बसवता केवळ सनमाईक लावून काम उरकण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय नवीन शौचालय बांधूनही अद्याप वीजजोडणीची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. निधी मंजूर असूनही सांडपाणी वाहिनी, इन्स्पेक्शन चेंबर आणि गुणवत्ता चाचणीसाठीच्या स्वतंत्र कामांची तरतूद अपूर्णच ठेवण्यात आली आहे.

पालकांचा एल्गार; दोषी कंत्राटदारावर कारवाईचा इशारा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या या निकृष्ट प्रकाराविरोधात पालकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. शासकीय निधीचा गैरवापर करून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर तसेच त्याला पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असा पवित्रा पालक सभेत सर्वानुमते घेण्यात आला.

बांधकामातील त्रुटी स्पष्ट असतानाही अंतिम बिल मंजूर करून घेण्याची घाई नेमकी कोणासाठी, असा सवाल पालक व शाळा व्यवस्थापन समितीने उपस्थित केला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी अन् बालहक्क आयोगाकडे तक्रार करणार

शौचालयातील सर्व त्रुटींची तातडीने दुरुस्ती न केल्यास कंत्राटदाराचे अंतिम बिल रोखावे, अशी ठाम मागणी पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे.

तसेच या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि बालहक्क आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोंडगाव शाळेतील या निकृष्ट बांधकामाची चौकशी करून दोषींवर काय कारवाई होते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 19-08-2026