Ganpatipule Panaji Bus Service: गणपतीपुळे-रत्नागिरी ते थेट गोवा एसटी सेवा अखेर सुरू; कदंबा महामंडळाचा पुढाकार

गणपतीपुळे ते पणजी प्रवासाचे भाडे ४५० रुपये; पर्यटन आणि स्थानिक प्रवाशांची मोठी सोय

रत्नागिरी:

Ganpatipule Panaji Bus Service (गणपतीपुळे पणजी बस सेवा): कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे आणि रत्नागिरीहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. गोवा राज्य परिवहन महामंडळाच्या (कदंबा) वतीने १५ ऑगस्टपासून ‘गणपतीपुळे ते पणजी’ थेट बससेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरी आणि गणपतीपुळे भागातून पणजीला जाण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची होणारी मोठी गैरसोय आता या नव्या सेवेमुळे दूर होणार आहे.

प्रमुख मार्ग आणि प्रवास भाडे

ही नवीन कदंबा एसटी बस गणपतीपुळे येथून सुटल्यानंतर खालील महत्त्वाच्या थांब्यांवरून प्रवास करणार आहे:

  • मार्ग: गणपतीपुळे ➔ रत्नागिरी ➔ पावस ➔ आडिवरे ➔ धारतळे ➔ राजापूर ➔ कणकवली ➔ कुडाळ ➔ सावंतवाडी ➔ म्हापसा ➔ पणजी
  • तिकीट दर: गणपतीपुळे ते पणजी प्रवासासाठी प्रति प्रवासी ४५० रुपये तिकीट आकारले जाणार आहे.

कदंबा महामंडळाच्या वतीने जास्तीत जास्त प्रवाशांनी व पर्यटकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

असे असणार बसचे वेळापत्रक

गणपतीपुळे येथून सकाळी सुटणारी ही बस टप्प्याटप्प्याने पुढील स्थानकांवर पोहचेल:

  • गणपतीपुळे (प्रस्थान): सकाळी ७.१५ वाजता
  • रत्नागिरी: सकाळी ८.३० वाजता
  • पावस: सकाळी ९.०० वाजता
  • आडिवरे: सकाळी ९.४० वाजता
  • धारतळे: सकाळी ९.५० वाजता
  • राजापूर: सकाळी १०.३० वाजता
  • पणजीहून परतीचा प्रवास (गणपतीपुळेकडे): दुपारी १.३० वाजता

वर्षानुवर्षांची गैरसोय झाली दूर

रत्नागिरी-पणजी ही सावंतवाडी आगाराची एसटी बससेवा गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याने पणजीकडे जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड हाल होत होती. कदंबा महामंडळाने स्थानिक प्रवाशांची निकड आणि पर्यटनाचा विचार करून ही थेट बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे कोकणातील स्थानिक नागरिक तसेच गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना या सेवेचा मोठा फायदा होईल, असा विश्वास एसटी प्रवासी मित्र सोहम बापट यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 19-08-2026