Pandit Shailesh Bhagwat Sangeet Natak Akademi Award: शहनाईच्या सुरांनी राजापूरचा राष्ट्रीय गौरव! पं. शैलेश भागवत यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात सन्मान; राजापूर तालुक्यातील कशेळी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

रत्नागिरी:

Pandit Shailesh Bhagwat Sangeet Natak Akademi Award (पं. शैलेश भागवत संगीत नाटक अकादमी पुरस्कार): शहनाई वादनाच्या क्षेत्रात तब्बल सहा दशकांहून अधिक काळ अखंड संगीतसाधना करून राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण करणारे राजापूर तालुक्यातील कशेळी गावचे सुपुत्र पं. शैलेश भागवत यांना शास्त्रीय संगीतातील शहनाई वादनातील योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. दिल्ली येथील विज्ञान भवनात १३ ऑगस्ट रोजी आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या राष्ट्रीय सन्मानामुळे राजापूर तालुक्यासह संपूर्ण कोकणाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचे मानाचे शिष्य

भारतीय शास्त्रीय संगीतात शहनाईला प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देणाऱ्या मोजक्या कलाकारांमध्ये पं. भागवत यांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचे मानाचे शिष्य म्हणून त्यांची देशभरात खास ओळख आहे.

२ जून १९५८ रोजी ठाणे येथे जन्मलेल्या पं. भागवत यांच्या संगीतप्रवासाची सुरुवात कोपिनेश्वर मंदिराच्या सानिध्यात झाली. पंडित औरंगाबादकर यांच्याकडून प्राथमिक संगीत शिक्षण घेतल्यानंतर, प्रख्यात सतारवादक पं. मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या साधनेला व्यापक दिशा मिळाली. पुढे उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या थेट मार्गदर्शनातून त्यांचे शहनाई वादन अधिक प्रगल्भ आणि समृद्ध झाले.

Pandit Shailesh Bhagwat Sangeet Natak Akademi Award: ‘गायकी अंग’ शैलीने सजले वादन

मानवी आवाजातील सूक्ष्म चढ-उतार व भावभावना व्यक्त करणाऱ्या ‘गायकी अंग’ शैलीचा प्रभाव पं. भागवत यांच्या वादनात प्रामुख्याने जाणवतो. शास्त्रीय संगीतासह नाट्यसंगीत, अभंग, भजन, गझल आणि शास्त्रीय चित्रपटसंगीतात त्यांनी आपल्या अष्टपैलू कलेचा अमिट ठसा उमटवला आहे.

देशभरातील विविध प्रतिष्ठित व्यासपीठांवर प्रात्यक्षिकांसह व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी शहनाईची कला रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले आहे. शहनाईच्या ध्वनिनिर्मितीमागील शास्त्रीय बाजूचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांना भारत सरकारची फेलोशिपही मिळाली असून, या विषयावरील त्यांचे संशोधन दिल्ली येथील सार्वजनिक ग्रंथालयाच्या अभिलेखागारात जतन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 19-08-2026