वालोपे गणेशवाडी येथील धक्कादायक घटना; वनविभागाकडून वाशिष्ठी नदीकाठी न जाण्याचे नागरिकांना आवाहन
चिपळूण:
Chiplun Crocodile Attack च्या एका थरारक घटनेत चिपळूण तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथे १० वर्षांच्या चिमुकलीने दाखवलेल्या अफाट धाडसामुळे एका महिलेचा जीव वाचला आहे. घरामागील वाशिष्ठी नदीच्या घाटावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक जीवघेणा हल्ला केला. मात्र, १० वर्षांच्या चिमुकल्या मुलीने प्रसंगावधान राखत थेट मगरीच्या दाढेतून आपल्या आईला सुखरूप बाहेर खेचून आणले.
कपडे धुताना मगरीची अचानक झडप
वालोपे गणेशवाडी येथील रहिवासी नंदिनी भूपेंद्र पवार (वय ३५) या संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास आपली १० वर्षांची मुलगी स्वर्णी हिच्यासह वाशिष्ठी नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्या कपडे धुण्यात मग्न असतानाच पाण्यात लपलेल्या एका अजस्त्र मगरीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. मगरीने नंदिनी यांचा पाय आपल्या जबड्यात पकडून त्यांना खोल पाण्यात ओढण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या हल्ल्याने नंदिनी यांनी जीवाच्या आकांताने मदतीसाठी हाक मारली आणि एका हाताने काठावरील मोठ्या दगडाला घट्ट पकडून ठेवले.
लेकीचे अतुलनीय शौर्य आणि आईचा बचाव
आईवर मगरीने हल्ला केल्याचे पाहून १० वर्षांची स्वर्णी अजिबात घाबरली नाही. तिने तात्काळ प्रसंगावधान राखत आईच्या मदतीसाठी नदीकाठी धाव घेतली. स्वर्णीने आईचा हात घट्ट धरून आपल्या संपूर्ण ताकदीने त्यांना पाण्याबाहेर खेचण्यास सुरुवात केली. या चिमुकलीच्या अभूतपूर्व धाडसामुळे आणि प्रयत्नांमुळे नंदिनी यांची मगरीच्या तावडीतून सुटका झाली.
कामथे रुग्णालयात उपचार आणि वनविभागाची भेट
या घटनेनंतर जखमी नंदिनी पवार यांना तातडीने उपचारासाठी कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक के. डी. इरमले (कोळकेवाडी), वनरक्षक रा. भा. गुंटे (रामपूर), लिपिक एस. ए. कलावंत आणि आर. आर. टी. सदस्य अथर्व घाग यांच्यासह रुग्णालयात जाऊन जखमी नंदिनी पवार यांची भेट घेतली व प्रकृतीची चौकशी केली.
वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा
पावसाळ्याच्या दिवसांत वाशिष्ठी नदीत मगरींचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे नागरिकांनी पोहण्यासाठी, कपडे धुण्यासाठी अथवा जनावरे धुण्यासाठी नदीपात्रात किंवा काठावर जाऊ नये, तसेच लहान मुलांना नदीकिनारी अजिबात पाठवू नये, असा गंभीर इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी दिला आहे. १० वर्षांच्या स्वर्णीने दाखवलेल्या या अतुलनीय शौर्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 21-08-2026














