Aare-Ware & Bhatye Beach Development: आरे-वारे आणि भाट्ये बीचचा होणार कायापालट; ४ कोटींच्या निधीला मंजुरी

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश; १ कोटी २० लाखांच्या निधीचे वाटप सुरू

रत्नागिरी:

रत्नागिरी तालुक्यातील पर्यटन विकासाला अधिक गती देण्यासाठी आणि पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध आरे-वारे आणि भाट्ये बीचच्या कायापालटासाठी तब्बल ४ कोटी रुपयांच्या प्रशासकीय निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीला प्रत्यक्ष मंजुरी मिळाली असून, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने निधी वितरणास अधिकृत मान्यता दिली आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या विशेष पाठपुराव्यातून हा निधी उपलब्ध झाला आहे.

आरे-वारे आणि भाट्ये बीच सुशोभीकरण

पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या आरे-वारे किनाऱ्याच्या सुशोभीकरणासाठी आणि पायाभूत सुविधा पुरवण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी २ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यातील ६० लाख रुपयांचा निधी प्रत्यक्ष मंजूर झाला आहे.

त्याच धर्तीवर निसर्गरम्य भाट्ये बीच येथे किनारी सुशोभीकरण आणि अत्याधुनिक नागरी सुविधा उभारण्यासाठी २ कोटींच्या प्रशासकीय मान्यतेसह ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

किनाऱ्यांवर या पायाभूत सुविधांचा होणार विकास

आरे-वारे आणि भाट्ये बीचवर पर्यटकांची नेहमीच गर्दी असते; मात्र तेथे काही मूलभूत सुविधांचा अभाव होता. या नव्या निधीमुळे खालील सुविधांचा विकास केला जाणार आहे:

  • रस्ते व कनेक्टिव्हिटी: किनाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते.
  • पार्किंग व्यवस्था: पर्यटकांच्या वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग प्लॅझा.
  • फूडस्टॉल्स व प्रसाधनगृहे: स्वच्छ व अत्याधुनिक स्वच्छतागृहे आणि अधिकृत फूडस्टॉल्स.
  • सुशोभीकरण: किनारी परिसर अधिक आकर्षक करण्यासाठी विद्युत रोषणाई व बैठक व्यवस्था.

या विकासकामांमुळे रत्नागिरीतील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याने स्थानिक ग्रामस्थ व व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:05 22-08-2026