राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यावरही सोडले टीकास्त्र; सत्तेसाठी बालिश प्रयत्न करत असल्याचा आरोप
मुंबई / रत्नागिरी:
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सध्या महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद पाहून उत्साही झालेल्या नेत्यांवर शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी जोरदार निशाणा साधला आहे. “वारसाहक्काने वडिलांची मालमत्ता किंवा पैसा मिळतो, पण पक्ष मिळत नसतो,” असा रोखठोक टोला त्यांनी लगावला आहे.
“अजून शिंदे गटाचा युक्तिवाद बाकी”
कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर ठाकरे गटातील काही नेते निष्कर्षाप्रत येत असल्याबाबत विचारले असता कदम म्हणाले, “काही लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे असतात. त्यांना स्वप्ने पाहू द्या. जेव्हा आमचे वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडतील, तेव्हा चित्र अधिक स्पष्ट होईल. लवकरच ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यावर घणाघात
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यातील ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमावरही रामदास कदम यांनी तीव्र शब्दांत टीका केली:
- गरिबी हटावचा सवाल: “काँग्रेसने वर्षानुवर्षे ‘गरिबी हटाव’चा नारा दिला, पण प्रत्यक्षात तळागाळातील सामान्य माणसासाठी काय केले? काँग्रेसच्या काळात केवळ हिंदू आणि मुस्लिम समाजात दरी निर्माण करण्याचे काम झाले.”
- मतांचे राजकारण: “मुस्लिम समाजाची मते घेऊन फक्त सत्ता भोगायची, पण त्यांच्या विकासासाठी काही करायचे नाही, हीच काँग्रेसची नीती राहिला आहे. हा माझा जबाबदारीने केलेला दावा आहे.”
- विद्यार्थ्यांना सोबत घेण्याचा बालिश प्रयत्न: “आता सर्व काही संपल्यामुळे शाळकरी मुलांना सोबत घेऊन यश मिळवण्याचा राहुल गांधी यांचा बालिश प्रयत्न सुरू आहे,” असा घणाघाती टोलाही त्यांनी लगावला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:21 22-08-2026














